सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मचरित्रात सावरकरांचं कौतुक
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचं 'फाईव्ह डिकेड्स इन पॉलिटिक्स' अशा नावाचं आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं आहे. त्यांच्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत कौतुक करण्यात आलेलं आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचं ‘फाईव्ह डिकेड्स इन पॉलिटिक्स’ अशा नावाचं आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं आहे. त्यांच्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत कौतुक करण्यात आलेलं आहे. सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे बडे नेते आहेत. ते केंद्रीय गृहमंत्रीदेखील राहिले आहेत. तसेच ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देखील आहेत. याशिवाय त्यांनी काही काळ राज्यपाल म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मचरित्रात सावरकरांचं कौतुक असल्याने काँग्रेसची आता कोंडी होण्याची शक्यता आहे. “स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामाजिक समता आणि दलितांच्या उद्धारासाठी काम केले”, असं मत सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात मांडलं आहे.
सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मचरित्रात नेमकं काय म्हटलं आहे?
“२५ मे १९८३ ला नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळयाच्या अनावरणाचा कार्यक्रम झाला. माझ्या मनात सावरकरांविषयी उच्च कोटीचा आदर असल्याने मी त्या कार्यक्रमाला गेलो. अस्पृश्यता आणि जातीयवाद निवारणात सावरकरांचे मोठे काम आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब देवरस हे त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर हजर होते. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात त्या कार्यक्रमाचे एक छायाचित्र प्रसिद्ध झाले. देवरस खुर्चीवर बसले आहेत आणि इतर सगळे सतरंजीवर. ते छायाचित्र पाहून एका काँग्रेस खासदाराने असा शेरा मारला की, RSS सरसंघचालकांच्या पायाशी बसणाऱ्या आणि सावरकरांसारख्यांना वंदन करणाऱ्या काँग्रेस जनांच्या पक्षनिष्ठेविषयी प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. देवरसांना मधुमेह आणि संधिवात हे आजार असल्यामुळे त्यांनी आम्हाला अगोदर सांगितलं होतं आणि परवानगीही मागितली होती”, असं सुशीलकुमार शिंदे यांनी आत्मचरित्रात म्हटलं आहे.
“सावरकरांना मी पाठिंबा दिला ह्या मुद्यावर मी ठाम राहिलो. जातीयवाद संपवण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. मी स्वतः मागासवर्गातला असल्यामुळे सावरकरांच्या या प्रयत्नांचे मला विशेष महत्व वाटते. ते प्रकरण तिथेच संपले, पण मी माझा मुद्दा मांडला”, असंही ते आत्मचरित्रात म्हणाले आहेत.
“एकेकदा मला आश्चर्य वाटतं की, सावरकरांचा मुद्दा निघाला की, आपण त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीवर इतका भर का देत असतो? त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला इतर अनेक पैलू आहेत. त्यांच्यातला तत्वज्ञ आणि विज्ञानवादी आपण पाहू शकत नाही का ? वास्तविक सामाजिक समता आणि दलितांच्या उद्धाराचा मुद्दा घेऊन सावरकर उभे राहिले. त्यामुळे त्यांना अनेकदा त्रास सोसावा लागला. सावरकरांबाबतचे संकुचित विचार हे आपल्यासमोरचं एक आव्हान आहे असं मी मानतो”, असं मत सुशीलकुमार शिंदे यांनी मांडलं.
सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून काँग्रेसच्या वाटचालीबाबतही भाष्य
सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात काँग्रेसच्या वाटचालीबाबतही भाष्य केलं आहे. “प्रदीर्घ काळ राजकारणात काम केल्यानंतर मला असे वाटते की, काँग्रेसच्या विचारसरणीत सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे”, असं मत सुशीलकुमार शिंदे यांनी मांडलं आहे. “मला असेही वाटते की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हा आपला नेता असतो, मग तो कोणत्याही राज्याचा असो. आणि आपण प्रदेशाध्यक्षांकडे पुरेसे लक्ष दिले पाहिजे. मात्र हे होत नाही. यामागचं कारण मला असं वाटतं की, राजकीय सत्ता आणि मुख्यमंत्री पदासारख्या मोठ्या पदांचाच मोह असतो. पण इथे एक लक्षात ठेवलं पाहिजे की, पक्ष आतून मजबूत असला तरच तुम्हाला सत्ता मिळते. ह्याची बरीचशी उदाहरणं आपण अलीकडच्या काळात अनेक राजकीय पक्षात पाहात आहोत”, असं सुशीलकुमार शिंदे आपल्या आत्मचरित्रात म्हणाले आहेत.