मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव; काँग्रेसची कोंडी?

अमित देशमुख हे काँग्रेसचे नेते असल्यानं काँग्रेसला हे मान्य आहे का?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:41 PM, 13 Jan 2021

मुंबईः गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून औरंगाबाद शहराचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला होता. त्यावरून प्रचंड गदारोळही झाला होता. आता पुन्हा एकदा या नामांतराच्या मुद्द्याला फोडणी मिळालीय. CMO कडून उस्मानाबाद शहराचा उल्लेख धाराशीव असा करण्यात आलाय. विशेष म्हणजे CMOने ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचा फोटो आहे. अमित देशमुख हे काँग्रेसचे नेते असल्यानं काँग्रेसला हे मान्य आहे का?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. (Dharashiv Mentions Osmanabad On CM Twitter Handle)

‘धाराशिव-उस्मानाबाद येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्न 430 खाटांचे रुग्णालय निर्माण करणे,’ असं सीएमओनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यावरून आता काँग्रेसची कोंडी झालीय.

नामांतराच्या विषयाला पुन्हा फोडणी
नामांतराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षांमध्येच एकमत नसल्याने विविध चर्चांना उधाण आलं होतं. या सर्व घडामोडी ताज्या असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव करण्यात आल्यानं नव्याच वादाला फोडणी मिळालीय.

शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदिप पुरी यांना पाठवत औरंगाबाद विमानतळाचं छत्रपती संभाजी महाराज असं नामांतर करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी काँग्रेसला औरंगजेब तुमचा आदर्श आहे का? असा रोखठोक सवाल केला आहे. त्यामुळे शिवसेना औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट झालं होतं.

नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध

शिवसेनेच्या या मागणीला राज्य सरकारमध्ये सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसनं विरोध केला होता. नाव बदलणं हा काँग्रेसचा कार्यक्रम नाही, अशा गोष्टींना विरोध राहील, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं होतं. तसंच राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही, असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या

CMO कडून औरंगाबाद शहराचा संभाजीनगर म्हणून उल्लेख, नामांतराचा मुद्दा आणखी पेटणार?

Dharashiv Mentions Osmanabad On CM Twitter Handle