OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?; विजय वडेट्टीवारांचा सवाल

मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. ओबीसीसह इतर मुलांचं वय वाढत चाललंय, त्यांना वेठीस धरायला नको

OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?; विजय वडेट्टीवारांचा सवाल

नागपूरः OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?, असा थेट सवाल मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी केला आहे. मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. ओबीसींसह इतर मुलांचं वय वाढत चाललंय, त्यांना वेठीस धरायला नको, असंही विजय वडेट्टीवारांनी सांगितलं आहे. (Vijay Wadettiwar On Maratha Reservation)

मराठा समाजावर अन्याय नको, पण ओबीसींवरही अन्याय नको. नोकरीभरतीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला तर ते योग्यच आहे. नोकर भरतीसाठी ओबीसी तरुणांमध्ये असंतोष वाढतोय. कालच्या कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी केली आहे. एका समाजासाठी इतरांवर अन्याय नको, अशा भावनाही विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केल्या आहेत. टीव्ही 9 कडे दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

देशात जातीच्या लोकसंख्येनुसार त्या त्या वर्गासाठी आरक्षण द्यावं, ही आमची जुनीच मागणी आहे. देशात ज्या समाजाचं जेवढं प्रतिनिधित्व, त्या समाजाला तेवढे टक्के आरक्षण द्यावं, अशी गेल्या अनेक वर्षांपासून आमची मागणी आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आता ही मागणी केलीय, असं मत कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

फक्त मराठा समाज SEBC नाही, तर आम्हीसुद्धा SEBC आहोत- हरिभाऊ राठोड

दुसरीकडे मराठा आरक्षणावर ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनीसुद्धा भाजपला धारेवर धरलं आहे. फक्त मराठा समाज SEBC नाही, तर आम्हीसुद्धा SEBC आहोत. भटके, विमुक्त, बारा बलुतेदार, धनगर हे सगळे SEBC आहेत, असं ओबीसी नेते हरिभाऊ राठोड म्हणाले आहेत. मोदी साहेबांनी घटनादुरुस्तीत ओबीसीची टर्म काढून टाकली. तसंही आम्ही SEBC होतो आणि आताही आहे, पण मधल्या काळात भाजपानं लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला, असा घणाघात हरिभाऊ राठोड यांनी भाजपवर केला आहे.

SEBC चा लाँग फॉर्म कधी दिला नाही. मराठ्यांना आम्ही SEBC देतो म्हणजे काही तरी वेगळं देतो असं ते सांगत होते. पण मधल्या काळात भाजपानं लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी आरक्षणाच्या बाबतीत वक्तव्य केलं आहे. आरक्षण हे लोकसंख्येनुसार सगळ्यांना देता येईल. मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचे असल्यास लोकसंख्येची गणना करावी लागेल, आपल्याला 2021च्या लोकसंख्येच्या गणनेची वाट बघायची गरज नाही. आपण आठ दिवसांतही लोकसंख्येची गणना करू शकतो, असंही हरिभाऊ राठोड यांनी अधोरेखित केलं आहे.

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात सर्व सामर्थ्याने लढा देत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. उमरगा ते मुंबई असा 580  कि.मी.चा पायी प्रवास करून आलेल्या मराठा तरुणांची भेट घेऊन त्यांना आरक्षणासंदर्भात शासन करत असलेल्या कार्यवाहीची मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.  तसंच हे सरकार तुमचंच असून तुमच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.

मोठी बातमी: मराठा आरक्षणावरुन आंदोलक आक्रमक; 7 नोव्हेंबरला मातोश्रीवर धडकणार मशाल मोर्चा

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर पडल्यामुळे आक्रमक झालेले मराठा आंदोलक आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर धडकणार आहेत. येत्या 7 नोव्हेंबरला मराठा क्रांती मोर्चाकडून मातोश्रीवर मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्वपक्षीय मराठा आमदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

सरकार तुमचेच, मराठा आरक्षणाची लढाई ताकदीनिशी सर्वोच्च न्यायालयात लढणार : मुख्यमंत्री

मोठी बातमी: मराठा आरक्षणावरुन आंदोलक आक्रमक; 7 नोव्हेंबरला मातोश्रीवर धडकणार मशाल मोर्चा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *