ठाकरे सरकारच्या काळात ऑक्सिजन माफिया निर्माण झाले, भाजपाचा घणाघात

महाराष्ट्रातील परिस्थिती लक्षात घेता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी दमण येथील रेमडेसिव्हीरची निर्मिती करणाऱ्या ब्रुक फार्मा या कंपनीला भेट दिली होती. bjp mla prasad lad

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 0:03 AM, 17 Apr 2021
ठाकरे सरकारच्या काळात ऑक्सिजन माफिया निर्माण झाले, भाजपाचा घणाघात
bjp mla prasad lad devendra fadanvis

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात पेट्रोल-डिझेल माफियाची निर्मिती झाली, आता ठाकरे सरकारच्या काळात ऑक्सिजन माफिया निर्माण झाले, असा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती लक्षात घेता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी दमण येथील रेमडेसिव्हीरची निर्मिती करणाऱ्या ब्रुक फार्मा या कंपनीला भेट दिली होती. त्यानंतर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारची पिसे काढलीय. (During the Thackeray government, the Oxygen Mafia was formed says bjp mla prasad lad)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्ण संख्येत देखील झपाट्याने वाढ

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्ण संख्येत देखील झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. असे असताना राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. महाराष्ट्रात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा जास्तीत जास्त पुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी कंपनीला केली. ब्रूक फार्माने महाराष्ट्राला दिवसाला 20 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर ब्रूक फार्माच्या फॅक्टरीचे मालक, प्रवीण दरेकर यांच्या समवेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना भेटले, त्यावर राजेश टोपे यांनी राज्य सरकारच्या परवानगीचे पत्र येत्या आठ तासांत ब्रूक फार्माला देऊ, असे आश्वासन दिले होते. पण 24 तास उलटून देखील अजून राज्य सरकारकडून कोणतेही पत्र ब्रुक फार्माला दिले गेलेले नाही, अशी माहिती प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

औषध विक्रेत्यांकडे रेमडेसिव्हीर साठा उपलब्ध नाही

ब्रुक फार्मा कंपनीमार्फत रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा महाराष्ट्रासाठी करण्याबाबत राज्य सरकारची भूमिका संदिग्ध आहे. औषध विक्रेत्यांकडे रेमडेसिव्हीर साठा उपलब्ध नाही. प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्यामार्फत जे शासनाचे पत्र आमदारांना पाठवले गेले ते आमदारांची दिशाभूल आहे, तुमचा खोटेपणा आहे की नाकर्तेपणा याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावे, अशी मागणीही प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत केली. रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार होऊन 965 रुपयाला मिळणारे औषध आज सामान्य जनतेला 1500 ते 1600 रुपयात विकले जात आहे. हा काळाबाजार राज्य सरकार आणि महानगरपलिकेच्या संमतीने होत आहे, यावर मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी केली.

राज्यात ऑक्सिजनसारख्या जीवनावश्यक गोष्टीचा तुटवडा

आज राज्यात ऑक्सिजनसारख्या जीवनावश्यक गोष्टीचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासतोय. वसई, विरार, नालासोपारा येथे एका रात्रीत 23 रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. त्याच वसई विरारमध्ये ऑक्सिजनने भरलेले टँकर रातोरात लुटले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात पेट्रोल-डिझेल माफिया ड्रग्स माफिया पाहायला मिळाले होते. मात्र आता ठाकरे सरकारच्या काळात ऑक्सिजन माफिया देखील निर्माण झाले आहेत, असा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी राज्य सरकारवर केला.

कोरोना व्यवस्थापन समिती स्थापन करावी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कोरोना व्यवस्थापन समिती स्थापन करावी, अशी महत्त्वाची मागणी यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी केली. भाजपचा प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ता सरकारबरोबर या समितीत असेल. माझ्या महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्या, हीच विनंती करतो, असे प्रसाद लाड म्हणाले.

संबंधित बातम्या

नालासोपाऱ्यात ऑक्सिजनअभावी 62 कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आरोप, सोमय्यांची मानवाधिकार आयोगाकडे याचिका

BMC ने रुग्णांचे चाचणी अहवाल लवकर द्यावेत, बेड मिळण्यात अडचण येऊ देऊ नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

During the Thackeray government, the Oxygen Mafia was formed says bjp mla prasad lad