राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

  • अनिल केऱ्हाळे, टीव्ही 9 मराठी, जळगाव
  • Published On - 17:00 PM, 19 Nov 2020

जळगावः राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. माझ्या सान्निध्यात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये, असं आवाहनही एकनाथ खडसे यांनी केलं आहे.  (Former Minister Eknath Khadse Infected With Corona)

टीव्ही 9 मराठीला स्वतः एकनाथ खडसेंनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे अ‌ॅक्शन मोडमध्ये आले होते. त्यांनी जिल्ह्यातील नेते तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती. त्या भेटीतूनच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


तर गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. रोहिणी खडसे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती. प्रकृती उत्तम असून खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती खुद्द रोहिणी खडसे यांनी दिली होती.

रोहिणी खडसे या जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय आहेत. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. रोहिणी खडसे यांनी कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे प्रकृती उत्तम असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

गेली 40 वर्षे भाजपला वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन भाजपचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाचं योगदान देणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी 23 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं होतं. उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याची घोषणा खडसे यांनी त्यावेळी केली होती.

जळगावमध्ये मेळावा घेऊन आमची ताकद काय आहे ते दाखवून देऊ, असं थेट आव्हानही त्यांनी भाजपला दिलं होतं.  त्यातच 21 व 22 नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा शरद पवारांनी केली होती. पवारांनी हा दौरा अचानक रद्द केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्या सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच एकनाथ खडसे स्वत: होम क्वारंटाइन आहेत. अशा परिस्थितीत उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला आणि त्या दौऱ्यात खडसेंनी उपस्थिती लावली तर चुकीचा संदेश जाईल, असा एक मतप्रवाह पक्षात होता. त्यामुळेच हा दौरा रद्द केल्याचं बोललं जात आहे.

संबंधित बातम्या

एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका; दमानिया यांचं राज्यपालांना साकडं

चालकाच्या प्रसंगावधानाने सुखरुप, कार अपघातानंतर एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया

(Former Minister Eknath Khadse Infected With Corona)