खडसेंच्या पक्षांतरानंतर गिरीश महाजन अ‍ॅक्टिव्ह, रक्षा खडसेंच्या गैरहजेरीवर पहिली कमेंट

या बैठकीत पक्ष संघटन मजबुतीच्या दृष्टीने वरिष्ठ नेत्यांकडून चाचपणी करण्यात आली. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजपा खासदार रक्षा खडसे या बैठकीला अनुपस्थित होत्या.

खडसेंच्या पक्षांतरानंतर गिरीश महाजन अ‍ॅक्टिव्ह, रक्षा खडसेंच्या गैरहजेरीवर पहिली कमेंट

जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खडसेंच्या राजीनाम्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा भाजपाच्या कोअर कमिटीच्या वतीने आज दुपारी पक्ष कार्यालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. (girish mahajan addressing meeting bjp)

या बैठकीत पक्ष संघटन मजबुतीच्या दृष्टीने वरिष्ठ नेत्यांकडून चाचपणी करण्यात आली. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजपा खासदार रक्षा खडसे या बैठकीला अनुपस्थित होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यावर भाजपा आमदार गिरीश महाजनांना विचारले असता ते म्हणाले, रक्षा खडसे काल रात्री पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेल्या आहेत. त्या संदर्भात त्यांनी वरिष्ठ नेत्यांना पूर्व कल्पना देखील दिली होती. पक्षाची परवानगी घेऊनच त्या दिल्लीला गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत संदर्भात तर्कवितर्क लढवणे चुकीचे असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसणार असल्यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याबाबत भूमिका मांडताना गिरीश महाजन म्हणाले की, भाजपा हा पक्ष विचारांवर चालणारा पक्ष आहे. हा व्यक्ती केंद्रित पक्ष नाही. त्यामुळे पक्षातील कोणी एक जण गेल्याने त्याचा काहीएक परिणाम पक्षाच्या संघटनेवर होत नसतो. एकनाथ खडसे गेल्याने भाजपाला कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही. याउलट आगामी काळात पक्षसंघटन मजबूत करण्यासंदर्भात चाचपणी सुरू असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.

कोअर कमिटीच्या वतीने तातडीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला प्रांत संघटक विजय पुराणिक, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, चंदूलाल पटेल, माजी आमदार स्मिता वाघ, आदींची उपस्थिती होती. या बैठकीनंतर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीच्या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, आजची कोअर कमिटीची बैठक ही नियमित स्वरूपाची होती. महाराष्ट्रात फक्त जळगाव जिल्ह्यात पक्षाची कार्यकारिणी गठीत करण्याचे काम राहिले आहे. ही कार्यकारिणी गठीत करण्यापूर्वी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या म्हणणे, त्यांचे मत जाणून घेण्यासाठी हो बैठक घेतली. त्यानंतर आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय आढावा घेऊन कार्यकारिणी जाहीर होणार आहे. पक्षसंघटन मजबुतीसाठी चाचपणी सुरू असल्याचे यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला गांभीर्य नाही

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, या विषयासंदर्भात सरकारला कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या बैठका सुरू आहेत, विचारविनिमयदेखील केला जात आहे. परंतु कोणत्याही प्रकारच्या ठोस निर्णयापर्यंत सरकार पोहोचत नाहीये. त्यामुळे या विषयात दिरंगाई होत आहे. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नसल्याने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्याचप्रमाणे काही नोकरभरतीदेखील रखडल्या आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही विशेष समिती स्थापन केली होती.

पाच सदस्यांच्या समितीने अभ्यासपूर्ण नियोजन केलेले होते. एकही मुद्दा आमच्या नजरेतून सुटलेला नव्हता. मात्र, पुढे दुर्दैवाने आमचे सरकार गेले. उच्च न्यायालयात आम्ही आरक्षण टिकवले. पण हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला. त्याठिकाणी आरक्षणाला स्थगिती मिळाली. सरकारला गांभीर्य नाही, त्यांचे नेते आणि मंत्र्यांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर दुमत आहे. अतिशय नियमांमध्ये बसून आरक्षण दिलेले होते. पण तीन पायाच्या शर्यतीसारख्या चालणाऱ्या सरकारच्या दिरंगाईमुळे या विषयाचा खेळखंडोबा झाला आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

फडणवीसांच्या प्रकृतीत सुधारणा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्यावर प्लाज्मा थेरपी करण्यात आली असून लवकरच ते बरे होतील, अशी माहिती गिरीश महाजन यांनी यावेळी दिली.

संबंधित बातम्या :

Raksha Khadse | एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर खासदार सूनबाई रक्षा खडसे म्हणतात…

Raksha Khadse | एकनाथ खडसेंचा राजीनामा व्यक्तिगत कारणांमुळे, मी भाजप सोडणार नाही : रक्षा खडसे

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *