धानोरकर यांची भाषा म्हणजे विकृत मानसिक चाळे; हंसराज अहिर यांचं टीकास्त्र

इतकी वाईट परिस्थिती काँग्रेस पक्षाची असताना खासदार बाळू धानोरकर यांची भाषा म्हणजे विकृत मानसिक चाळे आहेत

  • निलेश डाहाट , टीव्ही 9 मराठी , चंद्रपूर
  • Published On - 23:30 PM, 17 Jan 2021
धानोरकर यांची भाषा म्हणजे विकृत मानसिक चाळे; हंसराज अहिर यांचं टीकास्त्र

चंद्रपूर : काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यावरून आता माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि चंद्रपूरचे माजी खासदार हंसराज अहिर यांनी टीका केलीय. गेल्या दोन टर्मपासून काँग्रेस विरोधी पक्षनेता बनवू शकलेले नाहीत. इतकी वाईट परिस्थिती काँग्रेस पक्षाची असताना खासदार बाळू धानोरकर यांची भाषा म्हणजे विकृत मानसिक चाळे आहेत, अशी टीका माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि चंद्रपूरचे माजी खासदार हंसराज अहिर (Hansraj Ahir ) यांनी केलीय. ते चंद्रपुरात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. (Hansraj Ahir criticize Balu Dhanorkar On Narendra Modi)

त्यांनी पहिले आपल्या राष्ट्रीय पक्षाची स्थिती पाहून घ्यावी: हंसराज अहिर

बाळू धानोरकर यांच्यात विजयाचा उन्माद दिसून आलाय, देशाच्या पंतप्रधानांना आव्हान देण्याची त्यांची ऐपत नाही, त्यांनी पहिले आपल्या राष्ट्रीय पक्षाची स्थिती पाहून घ्यावी, विरोधी पक्षाचा नेता बनवायची यांची ताकत नाही, मोदींविरोधात कोणीही लढू शकतं, पण त्यांची भाषा कोणाला पटणार नाही, असं टीकास्त्रही हंसराज अहिर यांनी सोडलंय.

पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढायला तयार आहे, असं वक्तव्य बाळू धानोरकर यांनी केलं होतं. गेल्या लोकसभा निवडणुकीत तयारीसाठी फक्त 15 दिवस मिळाले होते. आता तयारीला तीन वर्षे बाकी आहेत. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढायला तयार आहे, असं काँग्रेस खासदार बाळू धानोरकर म्हणाले होते.

कोण आहेत बाळू धानोरकर?

बाळू उर्फ सुरेश धानोरकर हे मूळचे काँग्रेसी नेते नाहीत. लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळावं म्हणून बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसने उमेदवार घोषित केला होता. मात्र, बाळू धानोरकरांसाठी काँग्रेसने उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसला राज्यात केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला, ती म्हणजे चंद्रपूरची जागा.

केंद्रीय मंत्र्यांचा पराभव करणारा जायंट किलर

बाळू धानोरकर यांना काँग्रेसचं तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला. ते चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. केंद्रीय मंत्री असलेल्या हंसराज अहिर आणि शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांच्यात ‘काँटे की टक्कर’ झालीय. मात्र अखेर बाळू धानोरकर यांचा 45 हजारांच्या मताधिक्याने विजय झाला. तीन वेळा खासदार आणि केंद्रीय मंत्रिपद भूषवलेल्या भाजप नेत्याला एका आमदाराने पराभवाची धूळ चारल्याने धानोरकर जायंट किलर ठरले होते. त्यामुळे बाळू धानोरकरांना थेट पंतप्रधानांना आव्हान देण्याचा विश्वास वाटत आहे.

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदाराचा मोदींविरोधात शड्डू, लोकसभेला आव्हान देण्याची तयारी

Hansraj Ahir criticize Balu Dhanorkar On Narendra Modi