मी तसं बोललोच नाही, अशोक चव्हाणांचा ‘त्या’ विधानावरून यू-टर्न

काँग्रेसच्या महापालिकांना निधी दिला जात नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते.

  • राजू गिरी, टीव्ही 9 मराठी, नांदेड
  • Published On - 14:02 PM, 31 Oct 2020
hearing on Maratha reservation

नांदेड : मी तसं म्हणालोच नाही, तिथेही निधी मिळायला पाहिजे, अशी अपेक्षा असल्याचे मी सांगितले, असं म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याच्या विधानावरून यू-टर्न घेतला आहे. (Ashok Chavan On Congress Funding)

काँग्रेसच्या महापालिकांना निधी दिला जात नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. मी तसं म्हणालो नसल्याचं सांगत अशोक चव्हाणांनी एकप्रकारे हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याबाबत ते आज नांदेडमध्ये बोलत होते. या प्रकरणावर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

मी अशोक चव्हाण यांचं भाषण ऐकले नाही. पण मधल्या काळात काही निधी कमी मिळाला होता, तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी बैठक घेऊन प्रश्न मिटवला होता. सर्वांना समान निधी मिळाला आहे. आता सरकारमध्ये कुरबूर नाही. ज्यांनी देव पाण्यात बुडवून ठेवले त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नसल्याचं सांगत त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

“काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. त्यामुळे नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला,” असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत दाखल झाले. यावेळी त्यांनी परभणीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे विधान केले होते.

मराठवाड्याला जास्त निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार’

“सत्तेत असताना आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, या मताचा मी आहे. पण दुर्दैवाने कोरोनामुळे 30 टक्केच निधी मिळाला, पण मराठवाड्याला अधिकचा निधी देण्याची माझी भूमिका असल्याची ग्वाही यावेळी अशोक चव्हाण यांनी दिली.”“विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते. पण राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे महाविकासआघाडी प्रत्यक्षात आली,” असा गौप्यस्फोटही अशोक चव्हाण यांनी यावेळी केला.

“दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत युती करायची की नाही, या संभ्रमात होते. पण भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेबरोबर आघाडी करावी, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे मत होते. भाजपने काँग्रेस संपवण्याचे काम सुरु केले होते. त्यामुळे काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत येण्यास तयार झाला,” असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. यावेळी अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारच्या कृषी सुधारणा कायद्यांवरही टीकास्त्र सोडले.

संबंधित बातम्या : 

काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप; आघाडीत खळबळ

विधानसभेपूर्वी काँग्रेसला रामराम, अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत बड्या नेत्याची पक्षात घरवापसी

चंद्रकांत पाटलांनी निर्माण केलेले खड्डेच बुजवतोय; अशोक चव्हाणांचा टोला