मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांना उत्तर देईन, पंकजा मुंडेंचा विरोधकांना इशारा

कोण आली कोण आली महाराष्ट्राची वाघीण आली, अशा जोरदार घोषणाबाजी पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:47 PM, 25 Oct 2020

बीडः आपल्याला कुणीच हात लावू शकत नाही. बजेट कसं घ्यायचं आणि काम कसं करायचं हे मी जाणते. बीड माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मी जिथे आहे तिथेच आहे. मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांना उत्तर देईन, असं म्हणत पंकजा मुंडेंनी राजकीय विरोधकांना इशारा दिला आहे. (pankaja munde on sugercane worker)

आजही माझ्याकडे कुठलंच पद नाही. संपत्ती कमी झाली तरी चालेल पण माझ्या दारातली गर्दी कधी कमी होता कामा नये, अशीच मी प्रार्थना करते, असं भाजपा नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. भगवान गडावर उपस्थितांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. कोण आली कोण आली महाराष्ट्राची वाघीण आली, अशा जोरदार घोषणाबाजी पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. ऊसतोड कामगारांसाठीच माझा कारखानाही मी उशिरा सुरू केला. कारण माझ्या कामगारांचा संप सुरू आहे. बोलणाऱ्याचं काय जातं, जा तुम्ही संप करा म्हणून सांगतात. मुंबईत बसून निर्णय होत नाहीत.

ऊसतोड कामगारांचा प्रतिनिधी लवादात नको. असं ऊसतोड कामगारांच्या संघटनाच सांगत आहेत. कारखानदार ऊसतोड कामगारांचा नेता होऊ शकतो. ऊसतोड कामगारांचा नेता पक्षाचा नसतो, असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं आहे. पवार साहेब, जयंत पाटील यांच्याशी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर चर्चा झाली. शरद पवारांनाच ऊसतोड कामगारांचा प्रश्न सोडवण्यास सांगितल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. मी निवडणुकीत पराभूत झाले, तर माझ्या कार्यकर्त्यांनाच जास्त वाईट वाटलं. मी पक्षाची राष्ट्रीय मंत्री झाली असल्याचंही पंकजा मुंडेंनी अधोरेखित केले आहे.

आपल्याला कुणीच हात लावू शकत नाही. बजेट कसं घ्यायचं आणि काम कसं करायचं हे मी जाणते. बीड माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मी जिथे आहे तिथेच आहे. मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांना उत्तर देईन. मुंडेंच्या विचारांची जबाबदारी माझ्यावर आहे. मला तुमच्या कर्जात राहायला आवडेल, असंही उपस्थितांना संबोधून त्या म्हणाल्या. लॉकडाऊनमध्ये ऊसतोड कामगारांच्या भाकरी भिजत होत्या, आम्हाला खायला काही नाही, व्हिडीओ कॉल करून ते दाखवत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे भाऊच आहेत, त्यांनी प्रेमानं विचारलं किती आदळआपट करशील, तर मी म्हणाले ऊसतोड कामगारांसाठी आदळआपट करावीच लागेल. ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांना दिलेल्या 10 हजार कोटींच्या पॅकेजवरही पंकजा मुंडेंनी टीका केली. शेतकऱ्यांना भरघोस मदतीची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं.

या दसऱ्या मेळाव्याला कोणीही येऊ नये, असं मी सांगितलं आहे. परंतु ऑनलाइन मेळावा असतानाही बरेच लोक आले आहेत. हेलिकॉप्टरनं येण्याची परंपरा होती, पण कोरोनामुळे ही हेलिकॉप्टरऐवजी गाडीनं आले. अतिवृष्टीनं शेतकरी बेजार झाला आहे. भगवान बाबांची मूर्ती माझ्या पाठीशी आहे. भगवान बाबा आशीर्वाद पाठीशी आहे हे इथे येताना जाणवत होतं. माझे बंधू महादेव जानकर यांच्याशिवाय माझा कोणताही कार्यक्रम पूर्ण होत नाही. या नात्याला कोणाची दृष्ट लागू नये, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. विजयादशमीच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते, विजयादशमीला सीमोल्लंघन होत असतो. ही जबाबदारी खूप मोठी आहे. भगवान गडाकडे येताना गावोगावी माझं स्वागत केलं जात होतं. शेतकऱ्यांनी प्रेमानं फुलं देऊन भगवान बाबांना अर्पण करायला सांगितली हे पाहून माझं मन भरून आलं. लोकांच्या प्रेमानं मी भारावून गेले. ही लोक एवढी का प्रेम करतात, तेव्हा मागे वळून पाहिलं तर भगवान बाबांची मूर्ती दिसली आणि मुंडेसाहेबांची कीर्ती सोबत दिसली, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

त्या पॅकेजमध्ये रुमालही येत नाही

यावेळी मुंडे यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या दहा हजार कोटीच्या पॅकेजवरही घणाघाती टीका केली. १० हजार कोटीचं पॅकेज सरकारनं घोषित केलं. हे पॅकेज पुरेसं नाही. या दहा हजार कोटीच्या पॅकेजमध्ये साधा रुमालही येणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. या पॅकेजने शेतकरी, ऊसतोड कामगारांची दिवाळी कशी गोड होणार? असा सवाल करतानाच सरकारला हे पॅकेज वाढवण्याची मागणी करणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

मुंबईत बसून निर्णय का होऊ शकत नाही

ऊसतोड कामगारांचे निर्णय फडात बसूनच घेतले पाहिजेत असं कुणी सांगितलं. मुंबईत बसूनही निर्णय का होऊ शकत नाही?, असा सवाल करतानाच तुम्ही मुंबईत काय दिल्लीतही असला तरी इच्छा शक्ती असेल तर निर्णय होऊ शकतात. ऊसतोड कामगारांना न्याय मिळू शकतो, असं त्या म्हणाल्या.

120 आमदार बनवायचे आहेत

सध्या रात्र वैऱ्याची आहे. त्यामुळे सजग राहा. आपली वज्रमुठ कायम ठेवा. आपली वज्रमुठ कायम असेल तर मोठमोठी सत्ताही हादरून जाते. आपल्याला धर्मकारण आणि राजकारणाची सांगड घालायची आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र केल्याशिवाय समाजाचा विकास होऊच शकत नाही. आपल्याला राज्यात 120 आमदार बनवायचे आहेत, असं त्या म्हणाल्या.

शिवाजी पार्क भरवायचं आहे

आता मी राज्यात फिरणार आहे. गावोगावी जाऊन पाहणी करणार आहे. कोरोना असला तरी फिरणार आहे. रस्त्यावर कसं उतरायचं हे मला चांगलंच माहीत आहे. आता नुसतं भगवान गडावरच नाही तर आपल्याला मुंबईतलं शिवाजी पार्कही भरवायचं आहे. आपली शक्ती दाखवून द्यायची आहे, अशी घोषणा त्यांनी करताच पंकजा मुंडे जिंदाबादच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.