Legislative Council Elections: ठाकरे सरकारसाठी ही निवडणूक का महत्त्वाची?

…म्हणून ठाकरे सरकारसाठी ही निवडणूक महत्त्वाची, जाणून घ्या ‘कारणं’ Legislative Council Elections: Why Is This Election Important For Thackeray Government

  • माणिक मुंढे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 11:38 AM, 3 Dec 2020

मुंबईः राज्यात निकाल लागत असलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ठाकरे सरकारसाठी अनेक अर्थानं महत्त्वाची आहे. ती कारणं कुठली आहेत ते आपण पाहुयात…(Legislative Council Elections: Why Is This Election Important For Thackeray Government)

१. महाराष्ट्राचा कौल सांगणारी निवडणूक-

ही निवडणूक फक्त सहा मतदारसंघांत झालेली असली तरीसुद्धा जवळपास संपूर्ण महाराष्ट्राचा कौल सांगणारी आहे. कारण विदर्भ, खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशा विभागाचा कौल ह्या निकालातून मिळतोय. मुंबई आणि कोकणवगळता सर्व महाराष्ट्राचा कौल सांगणारी ही निवडणूक आहे.

२. वेगळा मतदार –

विधानसभेला सर्वसामान्य मतदार हा मतदान करतो. त्यातून आमदारांची निवड होते, पण या निवडणुकीत शिक्षक आमदारांसाठी शिक्षक मतदान करतायत तर पदवीधर आमदारकीसाठी पदवी असलेले तसच त्या पदवीवर नोकरी करणाऱ्यांचाही समावेश आहे. महाराष्ट्रात बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. तेही नोंदणीकृत मतदारांनी ह्या निवडणुकीत स्वत:चा कौल दिलाय. शिक्षक, सुशिक्षित, नोकरदार, सुशिक्षित बेरोजगार असा मध्यमवर्गीयांचं सरकारबद्दल काय मत आहे ते ह्या निकालातून महाराष्ट्राला पहिल्यांदाच कळतंय.

३. विधानसभेनंतरची पहिली निवडणूक-

जवळपास वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक पार पडली. त्यानंतर झालेली ही पहिलीच मोठी निवडणूक आहे तीही मुंबई, कोकणवगळता संपूर्ण महाराष्ट्राचा कौल सांगणारी. मधल्या काळात दुसरी कुठलीही निवडणूक झालेली नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या पण त्या कोविडमुळे होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे ही निवडणूक ठाकरे सरकारसाठी महत्त्वाची आहे.

४. मविआवर शिक्कामोर्तब की बिघाडी?-

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असे तिघे एकत्र येऊन सरकार स्थापन झालेलं आहे. अनपेक्षितपणे अशी झालेली आघाडी, लोकांच्या पसंतीस पडलीय की नाही, याचा निकालही आजच्या रिझल्टमधून लागेल. ती पसंतीस पडली असं दिसत असेल तर आगामी काळातल्या सगळ्या निवडणुका मविआ एकत्र लढण्याचं धाडस करतील. नसेल तर वेगळे मार्ग शोधले जाऊ शकतात. त्याचा निर्णय आजच्या निकालावर बराच अवलंबून असेल.

५. शिवसेनेचं हिंदुत्व की भाजपचं?-

या निवडणुकीत मविआनं सहा उमेदवार दिलेले आहेत. त्यात शिवसेनेचा एकच उमेदवार आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आहेत. पण भाजपनं सहाही ठिकाणी स्वत:चे उमेदवार दिलेले आहेत. म्हणजेच आघाडी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत झालीय. त्यात शिवसेनेला भाजपानं हिंदुत्वावर चांगलंच टार्गेट केलेलं आहे. शिवसेनेचं काँग्रेसीकरण झालेलं असून, बाळासाहेबांचं कट्टर हिंदुत्व शिवसेनेनं सोडल्याचा थेट आरोप भाजपानं प्रचारात केला तर बाबरी पडल्यानंतर बगला वर करणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असं सेना नेत्यांनी सरळ उत्तर दिलंय. शिवसेना-भाजपच्या हिंदुत्वाच्या लढाईचा निकालही आजच्या निकालात लागेल.

६. कोविडदरम्यानची मोठी निवडणूक-

महाराष्ट्रात गेल्या मार्चपासून कोविडचा शिरकाव झालाय. ठाकरे सरकार सत्तेवर येताच कोविडचं मोठं संकट उभं राहिलं. गाव, तालुका, वाड्या खेड्यातल्या जवळपास प्रत्येकाला कुठला ना कुठल्या स्वरूपाचा कोविडचा फटका बसला. त्या काळात सरकार म्हणून उद्धव ठाकरे लोकांच्या वेदनेवर फुंकर घालण्यात किती यशस्वी ठरले, याचा फैसलाही आजच्या निकालानं मिळेल. उद्धव ठाकरे हेच आघाडी सरकारचा चेहरा आहेत, तो किती यशस्वी झालाय त्याचाही फैसला होतोय.
                                             
७. भाजप-सेनेच्या ताटातुटीनंतरची निवडणूक-

वर्षभरापूर्वी भाजप सेनेनं विधानसभेची निवडणूक एकत्र लढवली. युती म्हणून त्यांना बहुमतही मिळालं. पण मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षात वाद झाला. तो इतका विकोपाला गेली की, शिवसेनेनं परंपरागत मित्र असलेल्या भाजपला सोडचिठ्ठी देत, कट्टर शत्रू म्हणून टीका करत आलेल्या काँग्रेससोबत सत्तेचा घरोबा केला. अर्थात त्याला जोड राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी दिली. गेल्या वर्षभरात भाजपनं जास्तीत जास्त वेळेस उद्धव ठाकरे आणि शिवसेनेलाच टार्गेट केलंय. ती टीका कुठला परिणाम करतेय तेही आजच्या निकालानं स्पष्ट होईल.

८. फडणवीसांच्या प्रतिष्ठेची निवडणूक-

फडणवीसांनी प्रभारी म्हणून बिहारची निवडणूक जिंकून दिल्याचा दावा त्यांचे समर्थक करतात. पण तेच फडणवीस पाच आमदार महाराष्ट्रात निवडून आणू शकतात का, असा सवाल विरोधक करत होते. त्याचा फैसला आज होतोय. फडणवीसांमुळेच महाराष्ट्रानं भाजपातली सत्ता गमावली, असा आरोप केला जातो. तरीही त्यांना पक्षात झुकतं माप मिळतं. त्यावर त्यांच्या पक्षातले नेते उघडपणे नाराजी व्यक्त करत नसले तरी धुसफूस असतेच. या निवडणुकीत जर जागा अपेक्षेसारख्या नाही मिळाल्या तर नाराजांना, विरोधकांना बळ मिळेल. फडणवीस घेरले जातील.

९. औरंगाबादची खासमखास निवडणूक-

औरंगाबादमधली निवडणूक खास ठरलीय ते तिथल्या उमेदवारांमुळे. राष्ट्रवादीनं सतीश चव्हाण यांना मैदानात उतरवलंय तर भाजपानं शिरीष बोराळकरांना. पण बोराळकरांबद्दल पंकजा मुंडेंपासून ते इतर अनेक भाजप नेते नाराज असल्याचं उघड झालं. त्यावर पंकजांनी वेळोवेळी उत्तरही दिलं. परिणामी भाजपचे रमेश पोकळेंसारखे बंडखोर मैदानात उतरले. उमेदवार निवडीत नेत्यांना विश्वासात घेतलं नाही तर काय होतं, याचा फैसलाही आजच्या निकालात होईल.

१०. मुंबई पालिकेसाठी महत्त्वाची निवडणूक-

आगामी काळात महाराष्ट्रात सर्वात मोठी निवडणूक होईल ती बीएमसीची. शिवसेना इथं वर्षानुवर्ष सत्तेत आहे. त्यांना भाजपनं आतापर्यंत साथही दिली. पण आता मात्र दोघेही स्वतंत्र लढतायत. मविआनं ही निवडणूक एकत्र लढावी की नाही याचा अंदाज आजच्या निकालातून येऊ शकतो. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा त्रिकुटाला मुंबई स्वीकारू शकते का, त्याचा धागा आज सापडण्याची शक्यता आहे. शिवसेनेसाठी राज्याच्या सत्तेएवढीच मुंबईतली सत्ता महत्त्वाची आहे. त्यामुळेच त्याची तयारी, अंदाज, जोखीम , धाडस अशा सगळ्याच अनुषंगानं काय निर्णय घ्यावा, यासाठी उद्धव ठाकरेंना आजच्या निकालांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

Legislative Council Elections: Why Is This Election Important For Thackeray Government

संबंधित बातम्या

नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा, नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का

विधानपरिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीत रंगत, भाजपची हायकोर्टात धाव