विधान परिषद : उर्मिला मातोंडकरांचे नाव मीडियात चर्चेत, आम्हाला त्याबाबत कल्पना नाही : अनिल परब

उर्मिला मातोंडकर हे नाव आपल्याकडे (मीडियात) चर्चेत आहे, आम्हाला त्याबाबत कल्पना नाही, असं परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब म्हणाले आहेत.

विधान परिषद : उर्मिला मातोंडकरांचे नाव मीडियात चर्चेत, आम्हाला त्याबाबत कल्पना नाही : अनिल परब

मुंबईः  उर्मिला मातोंडकर हे नाव आपल्याकडे (मीडियात) चर्चेत आहे, आम्हाला त्याबाबत कल्पना नाही, असं परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब म्हणाले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांच्या उमेदवारीबाबत त्यांना विचारले असता ते बोलत होते. (Anil Parab On Urmila Mtondkar)

कोणताही निर्णय घेताना पक्षाचा प्रमुख हा सारासार गोष्टींचा विचार करून निर्णय घेतो. त्याचे कारण असे आहे की, त्या कॅटेगरीत बसणारे कार्यकर्ते कोण आहेत? लोक कोण आहेत? हे कसे बसवायचे, याचा निर्णय प्रत्येक पक्षाचे पक्षप्रमुख घेत असतात, असंही अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.  शिवसैनिक किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांचा हा विषय नाही. तो त्या पक्षप्रमुखाचा विषय आहे की, त्याला कॅटेगरीत बसवायचे आहे. त्याची कॅटेगरी कशी बसवायची, त्याचे निकष काय असतील हे कुणाला बसवायचे हा अधिकार पक्षाला असतो आणि तो निर्णय त्या पक्षाचा पक्षप्रमुख घेतात, असंही अनिल परब म्हणाले आहेत.

या परिस्थितीत शिवसैनिकांना न्याय हा विषय मला कळलेला नाही. पक्षाचे प्रमुख सगळ्या कार्यकर्त्यांना ओळखतात. जो कॅटेगरीत बसतो, त्यांना ते बसवतील. ही प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. ज्यावेळेला कॅबिनेटचा प्रस्ताव त्यांच्याकडे (राज्यपाल) जाईल, तेव्हा ते काय निर्णय घेतात हे पाहूनच पुढचा निर्णय घेतला जाईल. या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. आता हवेतल्या गोष्टी. आम्ही प्रस्ताव पाठवू त्यानंतर काय होते याला महत्त्व असल्याचंही ते म्हणाले आहेत.

प्रत्येक पक्षाची नावे त्या त्या पक्षाचे नेते ठरवतात. जसे शिवसेनेचे पक्षप्रमुख शिवसेनेची ठरवणार. तेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत घडेल. त्यांचे नेते त्यांच्या उमेदवारांची नावे ठरवतील. ती यादी मुख्यमंत्री राज्यपाल कार्यालयाला पाठवतील ही पद्धत आहे. ही नावे दररोज चव्हाट्यावर बसून चर्चा करण्याची नाहीत. ही नवे प्रत्येक पक्षाचे नेते ठरवतील आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ती राज्यपालांकडे जातील.

काळजीपूर्वक नक्कीच प्रत्येक गोष्ट करावी लागते. राज्य शासन तशा पद्धतीने गोष्ट करते. त्यामुळे ह्या बाबतीत ही काळजी घेतली जाते. कायद्याचा प्रश्न असो वा कुठल्या पत्रव्यवहाराचा. कुणी स्थगिती देणं हा कुणाच्या अखत्यारितला विषयच नाही आहे, नियम स्पष्ट आहे. कॅबिनेट ठराव केलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या लेटरहेडवर नावे जातील, त्याला स्थगिती देण्याचा अधिकार कुणाला आहे, असं मला वाटत नाही. त्यामुळे जी नावे अंतिम झाली आहेत, ती राज्यपालांकडे जातील आणि राज्यपाल त्यावर योग्य तो निर्णय घेतील, असंही अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.

उर्मिला मातोंडकरांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील – संजय राऊत

दुसरीकडे उर्मिलाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे. उर्मिला मातोंडकरांचा विषय हा सीएमच्या अखत्यारित आहे, कॅबिनेटचा निर्णय आहे, सीएम निर्णय घेतील, असं संजय राऊत म्हणाले आहेत. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची विधान परिषदेवर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकिटावर उर्मिला मातोंडकर यांना आमदारकी मिळण्याची चर्चा आहे.

खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी उर्मिलाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतली, असं सांगत या विषयावर अधिक बोलणं टाळलं. उर्मिला मातोंडकर यांची विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेकडून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकीटावर गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा भाजप नेते गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव झाला होता.

काँग्रेसवर आगपाखड करुन सोडचिठ्ठी
मुंबई काँग्रेसच्या भल्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अंतर्गत राजकारण सोडवण्यासाठी काँग्रेसने माझ्या प्रतिमेचा गैरवापर करुन घेतला, असा दावा करत उर्मिला मातोंडकर यांनी अवघ्या सहा महिन्यात पक्षाला सो़डचिठ्ठी दिली होती. 45 वर्षीय उर्मिला मातोंडकर यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. उर्मिला यांचे रंगीला, प्यार तुने क्या किया, भूत, कौन यासारखे असंख्य चित्रपट गाजले आहेत. उर्मिला यांच्या डान्सचेही चाहते आहेत. त्यांनी काही रिअॅलिटी शोंचं परीक्षणही केलं आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्या बॉलिवूडमध्ये फारशा दिसल्या नव्हत्या. काही वर्षांपूर्वी ‘आजोबा’ या मराठी चित्रपटात त्या झळकल्या. राजकारणातून आपली सेकंड इनिंग सुरु करणाऱ्या उर्मिला यांनी अकाली राजकीय एक्झिट घेतल्याची चर्चा होती. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास ‘मराठी मुलगी’ मराठी माणसाच्या अस्मितेसाठी काम करेल, अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या :

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार : बड्या नेत्यांना मागे सारुन काँग्रेसकडून गीतकाराचे नाव निश्चित?

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार : काँग्रेसच्या तिघा नेत्यांवर हायकमांडचे शिक्कामोर्तब, कोणाकोणाची वर्णी?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *