साताराः कवी मनाचे नेते आणि बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी उद्धव ठाकरेंकडे एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केलीय. तशा आशयाचं पत्रच अभिजीत बिचुकले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय. उद्धव ठाकरे तुम्ही राजीनामा तरी द्या अन्यथा सक्तीच्या रजेवर जा. तुमचे सर्व मंत्री निष्क्रिय आहेत. मला 8 मार्च या महिला दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री करा. सर्व प्रशासनातील सगळ्यांना सुतासारखं सरळ करतो, असे पत्र अभिजीत बिचुकले यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं. (Make Me The Chief Minister Of One Day, Abhijeet Bichukale’s Letter Directly To Uddhav Thackeray)
नायक चित्रपटातील अनिल कपूरसारखेच अभिजित बिचुकलेंनी एक दिवस मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केलीय. नायक चित्रपटात अभिनेता अनिल कपूर एक दिवसाकरिता मुख्यमंत्री होतो आणि समाजात बोकाळलेल्या भ्रष्टाचारावर अंकुश आणतो आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडवतो. त्या काळात नायक चित्रपटाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. बिग बॉस कार्यक्रमानंतर साताऱ्याचे अभिजित बिचुकले हे आता एक दिवसाचा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. त्यांनी नुकतेच एक प्रसिद्धिपत्रक काढून ते मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या अभिजित बिचुकले यांनी आपली मागणी स्पष्टच मांडली आहे. पत्रात बिचुकले लिहितात, लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे कुटुंबप्रमुख आहात आणि गेल्या वर्षभर आपणच आपल्या बंगल्यातून बाहेर येत नाही. मुख्यमंत्री या नात्याने प्रशासनावर तसेच सहकारी मंत्र्यांवर अंकुश ठेवू शकलेला नाहीत. कोरोना महामारीत आपण आणि आपले सरकारी नियोजन कमकुवत आहे, हे जनतेच्या निदर्शनास आलेले आहे.
गेल्या दहा महिने लॉकडाऊन करून आपण कोरोनाला प्रतिबंध केला, असे भासवत असला तरी सर्वसामान्य जनता, श्रमिक, कष्टकरी शेतकरी आणि विशेष करून आम्हा कलाकारांवर उपासमारीची वेळ आणली आहे, हे विसरून चालणार नाही. राज्याची मला आस्था असल्याने बेरोजगार, उद्योजक, शेतकरी, कलाकार आणि हातावरचे पोट असलेल्या सर्व लोकांची मला आस्था असल्याने मी पोटतिडकीने आपल्याला सांगू इच्छितो आहे.
आपण आणि आपले मंत्री निष्क्रिय आहात तसेच प्रशासनावर सरकारची पकड नाही, हे सर्वसामान्य जनतेला कळून चुकले आहे. अशा परिस्थितीत ज्या प्रकारे आपण मुख्यमंत्री झालात त्याच प्रकारे जनतेच्या सेवेसाठी आपण मला एक दिवस स्वच्छेने राजीनामा देऊन किंवा सक्तीच्या रजेवर जाऊन मला फक्त एक दिवस मुख्यमंत्रिपदावर नियुक्त करा. मग बघा मी संपूर्ण मंत्रिमंडळ आणि प्रशासन कसे सुतासारखे सरळ करतो बघा, असे मत बिचुकलेंनी पत्रात व्यक्त केलंय.
संबंधित बातम्या :
अभिजीत बिचुकले यांचं डिपॉझिट जप्त, 500 मतं मिळतानाही नाकी नऊ
ना कोटी, ना लाख, अभिजीत बिचुकलेंची संपत्ती किती?
Make Me The Chief Minister Of One Day, Abhijeet Bichukale’s Letter Directly To Uddhav Thackeray