भाजपने सरकारचे डोळे उघडले; म्हणूनच मंदिराचे दार उघडले; नितेश राणेंचं टीकास्त्र

ठाकरे सरकारनं राज्यभरात सोमवार (16 नोव्हेंबर) पासून मंदिरं आणि धार्मिक स्थळं उघडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यावरच नितेश राणेंनी टीकास्त्र सोडलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:27 PM, 14 Nov 2020
भाजपने सरकारचे डोळे उघडले; म्हणूनच मंदिराचे दार उघडले; नितेश राणेंचं टीकास्त्र
Nitesh Rane

मुंबई: भाजपने सरकारचे डोळे उघडले. म्हणूनच मंदिराचे दारे उघडले, असं ट्विट करत भाजपचे आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारनं राज्यभरात सोमवार (16 नोव्हेंबर) पासून मंदिरं आणि धार्मिक स्थळं उघडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यावरच भाजप आमदार नितेश राणेंनी टीकास्त्र सोडलं आहे. (Nitesh Rane Criticize On Thackeray Government Temple Reopen Decision)

विशेष म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी मंदिर उघडण्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. इगोपोटी निर्णय रखडवला, मंदिरं उघडणे म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण, अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. टीव्ही 9 मराठीवर प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकरांनी ठाकरे सरकारला खडे बोल सुनावले. या सरकारनं हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. मात्र केवळ भाजप आंदोलकांना, पुजाऱ्यांना वारकऱ्यांना सपोर्ट करते, मग अहंकारातून त्यांना मदत करायची नाही, इगोपोटी हा निर्णय रखडवला होता, अशी टीकाही प्रवीण दरेकरांनी केली आहे.


उशिरा का होईना सरकारला शहाणपण सुचलं, या निर्णयामुळे सर्वांना दिलासा मिळेल, असंही प्रवीण दरेकरांनी अधोरेखित केले आहे. बार आणि रेस्टॉरंट सुरू होतात, मग हा निर्णय का रोखला होता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आमचाी मागणी हीच होती. गरीब माणूस पांडुरंग किंवा परमेश्वराचरणी समाधान आणि शांती शोधत असतो. शिवाय जे व्यवसाय यावर अवलंबून असतात, त्यांनाही उपासमार होणार नाही, अशी आमची मागणी होती, असंही प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मंदिरं सुरू करण्याच्या सुरू असलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी धार्मिकस्थळं उघडण्याची घोषणा करून दिवाळी निमित्त राज्यातील जनतेला मोठी भेट दिली आहे. मंदिरं सुरू करण्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला महत्त्वाचं आवाहनही केलं आहे. दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच, असं सांगत यापुढेही शिस्तीचं पालन करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.