मुंबईः ओबीसींना संविधानाने दिलेला अधिकार मागण्याचा हक्क आहे; संविधानाच्या पलिकडे जाणं चुकीचं असल्याचं मत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केलं आहे. मुंबईतील मराठी पत्रकार संघात ओबीसी समाजाची गोलमेज परिषद पार पडली. त्या परिषदेला विजय वडेट्टीवारही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाआडून मराठा समाजावर निशाणा साधल्यानं राज्यात ओबीसी आणि मराठा वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Vijay Wadettiwar On Maratha Reservation)
मी कुण्या जातीच्या विरोधात नाही. आम्हाला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे. आमचं काढून घ्या, आम्ही सहन करू पण, उद्या आमच्या पोरांचं भविष्य उद्ध्वस्त केलात तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही विजय वडेट्टीवारांनी दिला आहे. आडनाव वेगळं असलं तरी रंग एकच आहे, यावरून आपली लढाई काय असेल हे निश्चित आहे. अन्यायावरून लढणारा हा मर्द आहे. ओबीसीला संविधानाने दिलेला अधिकार मागण्याचा हक्क आहे. संविधानाच्या पलिकडे जाणं चुकीचं आहे. हक्काची जाणीव करून देण्याचं काम करून द्यावं लागतंय, असा टोलाही विजय वडेट्टीवारांनी लगावला आहे.
माझा बंगला म्हणजे ओबीसींचा अड्डा आहे. मी ओबीसींचा नेता आहे. त्यामुळे माझं घर ते त्यांचंच घर आहे. वाड्यात राहणाऱ्यांना तांड्यावरील गरिबी सहन होणार नाही. झाडाखाली झाड वाढत नाही, मोठ्या झाडाखाली तुम्ही वाढणार नाहीत, हे लक्षात ठेवा. मोठ्या झाडाखाली छोटी झाडं लावण्याचं काम सुरू आहे. पण आमचं झाड वाढेल कधी, असा सवाल आता विचारला जात आहे. लोकशाही मार्गाने ज्याला जे मागायचंय ते मागितलं पाहिजे. कुणी १० वेळा जातीवादी म्हटलं तरी चालेल. पण हक्क मागणारच, असा निर्धारही विजय वडेट्टीवारांनी बोलून दाखवला आहे.
हा विषय वेगळ्या दिशेनं चाललाय, शाळेत गणित, सायन्सचे शिक्षक नाहीत म्हणून ओबीसींची मुलं इंग्रजी शाळेत शिकली पाहिजेत.आम्ही मराठ्यांचा कधीच विरोध केला नाही. आमच्या पोरांचा विचार करा, त्यांच्या भविष्याशी खेळू नका. सच्चाई मांडताना कुणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही, मी जंगलातला त्यामुळे मी घाबरत नाही. आम्हाला वेठीस धरू नका, अडचणीत आणू नका, असा इशाराही विजय वडेट्टीवारांनी दिला आहे.
ओबीसी समाजाच्या गोलमेज परिषदेत वरील मागण्यांसह आणखी 15 मागण्यांचा ठराव आज पास करण्यात आला. सरकारने ओबीसी समाजाच्या या मागण्या तात्काळ मान्य कराव्या अशी मागणी ओबीसी गोलमेज परिषदेकडून करण्यात आली आहे.
OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?; विजय वडेट्टीवारांचा सवाल
संभाजीराजेंनी OBC कोट्यातून मराठा आरक्षणाचा अभ्यास करु नये, नापास होतील : प्रकाश शेंडगे
Vijay Wadettiwar On Maratha Reservation