औरंगाबादमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली

महात्मा फुले पुतळा ते कलेक्टर ऑफिसपर्यंत मनसेचा हा मोर्चा काढला जाणार आहे. (Maharashtra Navnirman Sena march)

  • दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद
  • Published On - 10:18 AM, 26 Nov 2020

औरंगाबाद : वाढीव वीजबिलाच्या विरोधात मनसेकडून आज ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर औरंगाबादेतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मोर्चाला परवानगी नाकारून पोलिसांच्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. परवानगी नाकारल्यानंतरही मनसे मोर्चा काढण्यावर ठाम आहे. महात्मा फुले पुतळा ते कलेक्टर ऑफिसपर्यंत मनसेचा हा मोर्चा काढला जाणार आहे. (Police Denied Permission For Maharashtra Navnirman Sena March)

राज्यात वाढीव वीजबिलाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. याच मुद्द्याला घेऊन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला विरोधकांकडून घेरलं जात आहे. मनसेनेही वाढीव वीजबिलाबाबत सरकारला धारेवर धरत वीज दरवाढीविरोधात आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. 26 नोव्हेंबरला आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मनसे मोर्चा काढणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती. वीजदरात सवलत देण्याचं आश्वासन राज्य सरकारनं दिलं होतं. पण ते पाळलं गेलं नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत असल्याचं बाळा नांदगावकर म्हणाले होते.

ज्यांना वीज बिलाचा शॉक बसला आहे, अशा सर्व नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन मनसेकडून करण्यात आलं होतं. मनसेचे राज्यभरातील मोर्चे अत्यंत शांतपणे काढले जातील असं नांदगावकर यांनी आवर्जून सांगितलं होतं. ‘राज्य सरकारनं वीज दरवाढीत सवलत देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते पाळलं नाही. आता पुन्हा एकदा 100 युनिटपर्यंत सूट देण्याचं आश्वासन ऊर्जामंत्री देत आहेत. या सरकारमध्ये सगळा सावळा गोंधळ सुरु आहे,’ अशी टीका नांदगावकर यांनी यावेळी केली होती.

या आंदोलनाच्या निमित्ताने मनसेने दादर, माहीम परिसरात खास होर्डिंग्ज लावले होते. यामध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या राज्य सरकारच्या घोषणेलाच टार्गेट करत ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, ‘सोमवारी भेटूच शॉकसाठी तयार राहा’, अशी खोचक वाक्यं या होर्डिंगजवर लिहिली होती. मनसेची ही मार्मिक पोस्टरबाजी मुंबई तसेच राज्यभरात चर्चेचा विषय बनली होती.

‘100 युनिटपर्यंत वीजबिल माफीच्या प्रस्तावावर विचार सुरू’

“काही दिवसांपूर्वी मी 100 युनिटपर्यंत वीज माफी करावी असं मला वाटतं, असं मी म्हटलं होतं. त्यासाठी अभ्यासगटाची समिती स्थापन करण्यात आली होती. मधल्या काळात कोरोना आल्याने या अभ्यासगटाच्या बैठका झाल्या नाहीत. त्यामुळे समितीचा अहवाल आला नाही”, अशी माहिती ऊर्जामंत्र्यांनी 21 नोव्हेंबरला दिली होती.  “आताची महावितरणची आर्थिक स्थिती पाहता 59 हजार कोटींची तफावत आली आहे. मागच्या सरकारनं जे पाप करून ठेवलं आहे. त्याचं निरसन करूनच 100 युनिट वीज माफीचा निर्णय घेण्यात येणार होता. पण जनतेला 100 युनिट वीज माफी देण्यावर मी ठाम आहे. ही वीज मी माफ केल्याचं तुम्हीही पाहाल,” असं आश्वासनही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलं होतं.

संंबंधित बातम्या :

वीज बिलाच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक, 26 नोव्हेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा

भाजप सर्व निवडणुका स्वबळावर लढणार; फडणवीसांनी मनसेसोबत युतीची शक्यता फेटाळली

‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, सोमवारी ‘शॉक’साठी तयार राहा; मनसेची माहीम, दादरमध्ये खोचक होर्डिंगबाजी