स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया नव्याने जाहीर होणार; उमेदवारांना अर्ज दाखल करण्याचा मार्ग मोकळा

राज्य निवडणूक आयोगाने आहे त्या टप्प्यावर तात्पुरती स्थगित केलेली सदर निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची आज घोषणा केलेली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:44 PM, 19 Nov 2020
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया नव्याने जाहीर होणार; उमेदवारांना अर्ज दाखल करण्याचा मार्ग मोकळा

मुंबई: कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्यानं जाहीर होणार आहेत. सदर निवडणूक प्रक्रिया नव्याने व जलद गतीने राबविण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी राज्याच्या निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यांच्या मागणीला यश आलं असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया नव्याने जाहीर होणार आहे. (Process Of Local Body Elections Will Be Announced Again)

राज्य निवडणूक आयोगाने आहे त्या टप्प्यावर तात्पुरती स्थगित केलेली सदर निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची आज घोषणा केलेली आहे. भाई जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, महानगर पालिका, नवी मुंबई, औरंगाबाद व वसई विरार, 9 नगर परिषदा, नगर पंचायती व पोटनिवडणुका, जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्या ( भंडारा व गोंदिया ) आणि 1570 ग्रामपंचायतीचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम व सुमारे 12015 ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना कार्यक्रम सुरू होता.

मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महापालिका, नगर परिषदा, नगर पंचायती, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रस्तावित असणाऱ्या निवडणुका 17 मार्च रोजीच्या आदेशानुसार आहे त्या टप्प्यावर स्थगित करून 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. पुढील 3 महिने कोणत्याही निवडणुका न घेण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या.

सदर प्रकरणी आज रोजी 7 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटून गेलेला आहे. उमेदवारी दाखल केलेल्या अनेकांना कोरोनामुळे निवडणूक प्रक्रियेस विलंब झाल्याने ते चिंताग्रस्त आहेत. तसेच कित्येक नवमतदार वयोमर्यादेने उमेवारीस आणि मतदानास पात्र ठरलेले आहेत. त्यामुळे सदर प्रकरणी झालेला दीर्घ काळ लक्षात घेण्यात आला आहे. तसेच नव्याने उमेदवारीस इच्छुकांची संधी हिरावली जाऊ नये, यासाठी सदर निवडणूक प्रक्रिया नव्याने व जलद गतीने राबविण्यात येण्याची गरज असल्याचेही शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.
दरम्यान राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द करण्यात आला असून, तो नव्याने जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली.

31 जानेवारी 2020 पर्यंत अद्ययावत केलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभेची ही मतदार यादी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित होती; परंतु भारत निवडणूक आयोगाने आता 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार यादी 20 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे नव्याने मतदार यादीत नाव नोंदविलेल्यांना निवडणूक लढविता यावी किंवा मतदान करता यावे म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या 5 फेब्रुवारी 2020 च्या आदेशान्वये ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादीदेखील रद्द करण्यात आली आहे. परिणामी आता या निवडणुकांसाठी मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे.

संबंधित बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत डाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई

(Process Of Local Body Elections Will Be Announced Again)