लातुरात सेनेनं काँग्रेससोबत फिक्सिंग केल्याचं दिसतंय: दरेकर

भाजपचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी टीकास्त्र सोडलंय.

  • समीर भिसे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 13:25 PM, 28 Jan 2021
लातुरात सेनेनं काँग्रेससोबत फिक्सिंग केल्याचं दिसतंय: दरेकर
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद

मुंबईः लातूरचे भाजपचे दिग्गज नेते संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी राज्यात विधानसभेला प्रचंड मोठ्या फिक्सिंगचा गौप्यस्फोट केल्यानं एकच खळबळ उडालीय. विशेष म्हणजे फिक्सिंगमध्ये फक्त शिवसेना, काँग्रेसचे नेतेच नाही, तर खुद्द भाजपचेही नेते होते, असंही त्यांनी सूचित केलंय. त्यावर भाजपचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी भाष्य केलंय. (Sambhaji Patil Nilangekar Says, Sena Alliance With Congress; Now The BJP MLA Says Already fixed)

”शिवसेनेला सीट सोडूनसुद्धा शिवसेनेने कमकुवत उमेदवार दिला, असं त्यांचं वक्तव्य होतं आणि शिवसेनेने काँग्रेसशी साटंलोटं केलं, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनंतर निकालातून पण दिसत आहे. आधीपासूनच एकमेकांना समजून घेण्याची भूमिका दिसून येत आहे”, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केलीय. त्यांनी मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

भाजपची देशमुखांसाठी फिक्सिंग?

लातूर ग्रामीणची जागा परंपरागतपणे भाजप लढवतं. पण गेल्या विधानसभेला ती जागा भाजपानं सोडली आणि औशाची जागा स्वत:साठी घेतली. औशातून देवेंद्र फडणवीस यांचे पीए राहिलेले अभिमन्यू पवार उभे राहिले आणि निवडूनही आले. त्यांनी काँग्रेसचे त्यावेळेचे आमदार बस्वराज पाटील यांचा पराभव केला. औशाची जागा परंपरागतपणे शिवसेना लढवते. दिनकर माने हे तिथं शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत. लातूर ग्रामीणमधून विलासराव देशमुखांचे पुत्र आणि मंत्री अमित देशमुखांचे बंधू धीरज देशमुख यांनी निवडणूक लढवली. शिवसेनेने सचिन देशमुख हा फारसे परिचित नसलेला उमेदवार दिला. परिणामी लातुरात धीरज देशमुख विरुद्ध नोटा अशी लढत झाली. देशातली कदाचित ही एकमेव लढत असावी जिथं मुख्य उमेदवार विरुद्ध नोटा अशी लढत झाली असावी.

फडणवीसांच्या पीएसाठी पंकजा समर्थक उमेदवाराचा बळी?

लातूर ग्रामीणमधून 2014 साली पंकजा मुंडे समर्थक रमेश कराड हे थोड्या फरकाने पडले होते. गेल्या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. पण फडणवीसांच्या पीए राहिलेल्या अभिमन्यू पवार यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यासाठी त्यांनी औशाची निवड केली. पण तो मतदारसंघ तर सेनेकडे होता. भाजपने मग पंकजा मुंडे समर्थक उमेदवाराचा मतदारसंघ फडणवीसांच्या पीएसाठी देऊन टाकला. परिणामी भाजपाच्या त्या एका निर्णयाने पंकजा मुंडेंनाही शह बसला.

अमित देशमुखांनी काँग्रेसचाच उमेदवार पाडला?

लातूर ग्रामीण आधी भाजपने सोडला, नंतर तिथे शिवसेनेने दुबळा उमेदवार दिला. परिणामी अमित देशमुखांचे बंधू धीरज निवडून आले. पण त्या बदल्यात अमित देशमुखांनी काय केलं? तर त्याचं उत्तर आहे औसा. तिथे फडणवीसांचे पीए अभिमन्यू पवारांना निवडून आणण्यासाठी अमित देशमुखांनी मदत केल्याची त्यावेळेसही उघड चर्चा होती आणि आता संभाजी पाटलांनीही ते सुचित केलंय. म्हणजे स्वत:च्या भावाच्या विजयासाठी अमित देशमुखांनी काँग्रेसचे त्यावेळेसचे आमदार आणि शिवराज पाटील चाकुरकरांचे मानसपुत्र बस्वराज पाटील यांचा पराभव करण्यात मदत केली. म्हणजे फडणवीसांच्या पीएसाठी इथं फिक्सिंग झाली असं तर संभाजी पाटलांना सुचवायचं नाहीय?

संबंधित बातम्या :

…तर मी राजीनामा दिला असता, संभाजी पाटील निलंगेकरांनी अमित देशमुखांना डिवचलं

त्यावेळी भाजप नेते रमेश कराड शिवबंधन बांधणार होते, पण…. निलंगेकरांचा दावा

निलंगेकर म्हणतात, लातुरात लोकशाहीचा खून! ठाकरे, फडणवीस, देशमुखांकडे अप्रत्यक्ष बोट, राजकीय ‘फिक्सिंग’चा गौप्यस्फोट !

Sambhaji Patil Nilangekar Says, Sena Alliance With Congress; Now The BJP MLA Says Already fixed