महामंडळ बरखास्त करायचं टायमिंग चुकलंय, संभाजीराजेंचा ठाकरे सरकारवर प्रहार

तर अशोक चव्हाण यांनी समाजातील तज्ज्ञ लोकांची समिती नेमून सुप्रीम कोर्टातील लढाईसाठी चर्चा करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.

  • भूषण पाटील, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर
  • Published On - 16:39 PM, 10 Nov 2020
महामंडळ बरखास्त करायचं टायमिंग चुकलंय, संभाजीराजेंचा ठाकरे सरकारवर प्रहार

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त केल्याबद्दल भाजपाचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. महामंडळ बरखास्त करायचे तर ते आधीच करायला हवे होते. आता त्यांचा टायमिंग चुकलंय, अशी टीका भाजपचे खासदार संभाजीराजेंनी केली आहे. (sambhaji raje on )

तातडीने महामंडळाचे पुनर्गठन करून मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर अशोक चव्हाण यांनी समाजातील तज्ज्ञ लोकांची समिती नेमून सुप्रीम कोर्टातील लढाईसाठी चर्चा करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. ज्या अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजासाठी बलिदान दिले, त्यांच्या नावाने असलेल्या महामंडळाचे नेतृत्व त्यांचेच चिरंजीव सक्षमपणे करत असताना, ते महामंडळ बरखास्त का केलं? सरकारचा तो अधिकार असेलही, पण ही वेळ नव्हती. समाजात याबाबत अक्रोश निर्माण झाला आहे, असं टीकास्त्रही संभाजीराजेंनी सोडलं आहे.


अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ बरखास्त करण्याचा मोठा निर्णय उद्धव ठाकरेंच्या सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मंडळाच्या सर्व नेमणुका रद्द करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाला हा एक प्रकारे मोठा धक्का असल्याचं समजलं जात आहे. अध्यक्ष नरेंद्र पाटील गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका करत होते. त्यामुळेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ बरखास्त निर्णय घेण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील एक लाख मराठा तरुणांना उद्योग, रोजगार तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट असल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं होतं. आतापर्यंत 11 हजार मराठा तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून साडेपाचशे कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील ( Narendra Patil president Annasaheb Patil mahamandal) यांनी दिली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला नागपुरात बोलावून अधिवेशनादरम्यान महामंडळाचा आढावा घेतल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं होतं. महामंडळ अजून गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा जबाबदारी सांभाळण्यास सांगितले असल्याचंही पाटील यांनी म्हटलं होतं. पण आता अचानक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त केल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

11 हजार मराठा तरुणांना 550 कोटी रुपयांचे कर्जवाटप : नरेंद्र पाटील

नरेंद्र पाटील-शिवेंद्रराजेंचा एकत्र मिसळीवर ताव, साताऱ्यात उदयनराजेंना धक्का?