वाशिमः टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी अडचणीत सापडलेले संजय राठोड उद्या पोहरादेवीला जाणार असल्याची अधिकृत माहिती मिळालीय. राज्याचे वन, भूकंप आणि पुनर्वसन मंत्री संजय राठोड हे 23 फेब्रुवारी रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. 23 फेब्रुवारी रोजी 11.30 वाजता श्रीक्षेत्र पोहरागड (ता. मानोरा) येथे त्यांचे आगमन होणार असून, दुपारी 1 वाजता धामणगाव देव (ता. दारव्हा)कडे प्रयाण करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून गायब असलेले संजय राठोड पहिल्यांदाच सर्वांसमोर येणार आहेत. जवळपास 15 दिवसांनंतर संजय राठोड मीडियासमोर येणार आहेत. सध्या संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली आहे. (Sanjay Rathod In Yavatmal, Will Reach Pohardevi Tomorrow Morning, Supporter Claims)
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच मंत्री संजय राठोड उद्या पोहरादेवी येथे येत आहेत. संजय राठोड यांच्या स्वागतासाठी पोहरादेवी येथे जोरात तयारी सुरू आहे. पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवीला ते जाणार आहेत.
पूजा प्रकरणात आरोप झाल्यानंतर संजय राठोड मंगळवारीच पोहरादेवी इथं सर्वांसमोर येणार आहेत. राठोड शक्तिप्रदर्शन करून नेतृत्वावर दबाव आणतील, अशीही चर्चा आहे. मात्र पोलिसांनी पोहरादेवी संस्थानला एक नोटीस बजावलीय. ज्यात फक्त 50 लोकांनाच कार्यक्रमावेळी हजर राहण्याची परवानगी दिलीय. त्यामुळे पोहरादेवीत राठोड आपली भूमिका कशा प्रकारे स्पष्ट करतात आणि नोटीस बजावल्याप्रमाणे फक्त 50 जण उपस्थित राहतात, बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी इथं बांजरा गर्दी करणार हे राठोड आल्यावरच कळणार आहे.
कोरोनाचा संसंर्ग वाढत असल्याने जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावर संजय राठोड समर्थक मोठ्या प्रमाणात पोस्ट व्हायरल करत आहेत. त्यामुळं पोहरादेवी येथे गर्दी होऊ नये म्हणून मानोरा पोलिसांनी बजावलेली नोटीस बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांना मिळाली आहे. यासंदर्भात आम्ही आज 3 वाजता चर्चा करून बंजारा समाजाला आवाहन करणार असल्याचे महंत सुनील महाराज यांनी सांगितले.
बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज हे संजय राठोड यांच्या कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र महाराज कर्नाटकमध्ये असून ते उद्या पोहरादेवी येथे हजर राहणार आहेत, अशी माहिती महंत सुनील महाराज यांनी दिली आहे.
मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने रितसर तक्रार दाखल केली. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, चौकशीची मागणी केली. इतकं सगळं होत असताना, पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडलेले मंत्री संजय राठोड यांचं नावही उघड झाले.
संबंधित बातम्या:
पुणे पोलिसांचे पथक यवतमाळमध्ये दाखल, रुग्णालयातील उपचाराबाबत तपास होणार
Sanjay Rathod In Yavatmal, Will Reach Pohardevi Tomorrow Morning, Supporter Claims