छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे काय दिल्लीत लोटांगण घालायला गेले होते का?; संजय राऊत यांनी शिंदे गटाला सुनावले
दिल्ली आम्हाला चांगली माहिती आहे आणि त्या सोनिया गांधीजींच्या पाठिंब्यामुळे आपणही मंत्रिमंडळात होतात महाशय हे लक्षात घ्या", असेही संजय राऊतांनी म्हटले.
Sanjay Raut Criticism Eknath Shinde : ठाकरे गटाकडून सध्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकल आहे. आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे ठाण्यात जाहीर सभा घेणार आहेत. या सभेपूर्वी ठाण्यात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरद्वारे उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. यावरुन आता ठाकरे गटाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत गेले होते, ते काय लोटांगण घालायला गेले होते का? असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
ठाण्यात झळकणाऱ्या या बॅनरवर एक व्यंगचित्र पाहायला मिळत आहे. या व्यंगचित्राद्वारे उद्धव ठाकरे हे राहुल गांधींसमोर लोटांगण घालताना दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यासोबतच या बॅनरवर घालीन लोटांगण, वंदिन चरण, असा मजकूरही लिहिण्यात आला आहे. आता यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
“छत्रपती शिवराय दिल्लीत लोटांगण घालायला गेले होते का?”
“आम्ही महाविकासआघाडीमध्ये आहोत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर ज्यांना सध्या बसवलेलं आहे, ते लोटांगण घालूनच बसले आहेत. आतापर्यंत गेल्या 60 वर्षात सगळे मुख्यमंत्री मिळून जितक्या वेळा दिल्लीला गेले नसतील, तेवढे हे एक मुख्यमंत्री लोटांगण घालायला गेले असतील”, असा घणाघात संजय राऊतांनी केला.
“दिल्लीत फक्त लोटांगण घालण्यासाठी जात नाही तर दिल्ली ही देशाची राजधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत गेले होते ते काय लोटांगण घालायला गेले होते का? पेशव्यांनी दिल्लीत जाऊन दिल्ली जिंकली होती ते काय लोटांगण घालायला गेले होते का? सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला आम्ही यशवंतरावांचा उल्लेख करतो ते काय लोटांगण घालायला गेले होते का? चिंतामण देशमुखांनी नेहरूंच्या तोंडावर राजीनामा फेकला अर्थमंत्री पदाचा ते काय लोटांगण होतं का?” असे अनेक प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केले.
“त्याला लोटांगण म्हणता येणार नाही”
“बाळासाहेब ठाकरे,उद्धव ठाकरे यांनी मोदी शहांच्या जुलमी कारभाराशी, त्या मोगलाईशी आणि दिल्लीशी जी झुंज दिली, त्याला लोटांगण म्हणता येणार नाही. त्याला स्वाभिमान म्हणतात. महाराष्ट्राचे राज्यकर्ते आज दिल्लीच्या दाराचं पाय पुसणं म्हणून बसले आहेत. त्याला लोटांगण म्हणतात”, अशीही टीका संजय राऊतांनी केली.
“तुम्हीही सोनिया गांधींच्या पाठिंब्यामुळेच…”
“महाराष्ट्राचा इतिहास या लोकांनी समजून घ्यावा, ज्यांनी आमचा पक्ष चिन्ह चोरलं, ज्यांनी चोऱ्या लांड्या लबाड्या केल्या, त्यांनी आम्हाला दिल्लीचा राजकारण शिकवू नये. तुमच्या आधीपासून आम्ही दिल्लीला आहोत आणि दिल्ली आम्हाला चांगली माहिती आहे आणि त्या सोनिया गांधीजींच्या पाठिंब्यामुळे आपणही मंत्रिमंडळात होतात महाशय हे लक्षात घ्या”, असेही संजय राऊतांनी म्हटले.