आमदार शिवेंद्रराजेंच्या कट्टर समर्थकाचा भाजपला रामराम, हाती बांधलं ‘घड्याळ’

शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपप्रवेश केला

आमदार शिवेंद्रराजेंच्या कट्टर समर्थकाचा भाजपला रामराम, हाती बांधलं 'घड्याळ'


सातारा : भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आमदार शिवेंद्रराजेंचे कट्टर समर्थक मानले जाणाऱ्या शशिकांत वाईकर (Shashikant Waikar) यांनी समर्थकांसह राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde), दीपक पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

राष्ट्रवादीत प्रवेशापासूनच वाईकरांवर टीका

शिवेंद्रराजे समर्थक आणि पंचायत समितीचे उपसभापती अरविंद जाधव यांनी नुकतीच शशिकांत वाईकरांवर टीका केली होती. “टेंडरसाठी राजकारणात शिरलेल्या ठेकेदारांना परळी भाग कधीही थारा देणार नाही, ठेकेदारांना राष्ट्रवादीत का घ्यायचे? याचा विचार पक्षाने करण्‍याची गरज आहे” असं मत त्यांनी व्‍यक्‍त केलं होतं.

“शशिकांत वाईकर यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विकासाचे नव्हे, तर संधीसाधू राजकारण केले आहे. ज्यांनी आजवर परळी भागाच्या विकासासाठी एक दमडीही खर्च केली नाही, परळी भागातील लोकांसाठी कुठेही कधीही उभे राहिले नाहीत. कोरोना, अतिवृष्टी, पुनर्वसन यासारख्या कोणत्याही सामाजिक प्रश्नावर कवडीचेही काम केले नाही, अशा मंडळींनी केवळ टेंडर मिळण्याच्या हेतूने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. ज्यावेळी परळी भागातील जनता विविध समस्यांनी त्रस्त होती, त्या वेळी ही मंडळी कुठे होती?” असा सवालही अरविंध जाधव यांनी पत्रक काढून उपस्‍थित केला होता.

शिवेंद्रराजे कोण आहेत ?

शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपप्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.

शिवेंद्रराजे आणि उदयनराजे हे चुलतबंधू. मात्र गेल्या काही काळात दोघांमध्येही विस्तव जात नव्हता. आधी दोघंही राष्ट्रवादीत होते, नंतर दोघंही भाजपात गेले. भाजपप्रवेशाच्या वेळी दोन्ही राजेंचं मनोमीलन झाल्याचं पाहायला मिळालं.

शिवेंद्रसिंहराजे आणि शशिकांत शिंदेंचा वाद शिगेला

भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यातील वादाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काही महिन्यांपूर्वी शिवेंद्रराजे भोसले यांनी जाहीर कार्यक्रमात, ‘मी उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढवून निवडून आलेला माणूस आहे. समोरच्याची वाट लागल्याशिवाय गप्प बसत नाही’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा रोख शशिकांत शिंदे यांच्या दिशेने असल्याची चर्चा होती. त्यामुळे शशिकांत शिंदे यांनीही शिवेंद्रराजे यांना प्रत्युत्तर दिले होते.

शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीत आले तर ते नगरपालिका निवडणुकीचे नेतृत्व करतील: शशिकांत शिंदे

विशेष म्हणजे त्यानंतरच शशिकांत शिंदे यांनी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवेंद्रराजे भोसलेंना एक ऑफरही दिली होती. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीत आले तर ते नगरपालिका निवडणुकीचे नेतृत्व करतील, अशी ऑफर शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसलेंना दिली होती.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या : 

शिवेंद्रराजे भोसलेंना राष्ट्रवादीची मोठी ऑफर; शशिकांत शिंदे म्हणतात…

शशिकांत शिंदेंना राष्ट्रवादीच्या नेत्याचा घरचा आहेर, शिवेंद्रराजेंना पक्षप्रवेशाची ऑफर दिल्यामुळे नाराजी

शशिकांत शिंदेंसोबत दिलजमाईचे संकेत, शिवेंद्रराजेंचे ‘राष्ट्रवादी पुन्हा’?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI