बंडखोरांना शेवटचा अल्टिमेटम! 16 आमदारांना पुन्हा नोटीस, सोमवार संध्याकाळपर्यंत उत्तर देण्याचे आदेश

बंडखोर आमदारांवरील या नोटिशीविरोधात आता एकनाथ शिंदे गट कोर्टात धाव घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

बंडखोरांना शेवटचा अल्टिमेटम! 16 आमदारांना पुन्हा नोटीस, सोमवार संध्याकाळपर्यंत उत्तर देण्याचे आदेश
Image Credit source: tv9 marathi
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jun 25, 2022 | 4:09 PM

मुंबईः एकनाथ शिंदे यांच्या गटाविरोधातील कायदेशीर फास अधिक जोरकसपणे आवळण्याचं शिवसेनेनं ठरवलं आहे. विधानसभा उपाध्यक्षांनी आज पुन्हा एकदा 16 आमदारांना नोटीस पाठवली आहे. सोमवार संध्याकाळपर्यंत कोणत्याही स्थितीत नोटिशीला उत्तर देण्याचं अल्टिमेटम आमदारांना (Shiv Sena MLA) देण्यात आलं आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदारांना नुकतीच नोटीस पाठवल्यामुळे आता शिंदे गटातील आमदारांची यावर काय भूमिका आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेशी बंडखोरी करून एकनाथ शिंदे गटातील आमदार गेल्या काही दिवसांपासून गुवाहटीत आहेत. यापैकी 16 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी विनंती शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्यानुसार विधानसभा उपाध्यक्षांनी आमदारांना नोटीस पाठवली आहे.

16 आमदारांवर कारवाई का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पक्षाचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी एक व्हीप काढला होता. त्यानुसार, सर्व आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन कऱण्यात आले होते. मात्र एकनाथ शिंदे गटातील अनेक आमदारांनी पक्षादेश पाळला नाही. त्यामुळे या आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई का केली जाऊ नये, अशी मागणी करणारे पत्र विधानसभा उपाध्यक्षांकडे पाठवण्यात आले होते. त्यानुसार, आता उपाध्यक्षांनी 16 आमदारांना नोटीस पाठवली आहे. तसेच ईमेल किंवा पत्राच्या माध्यमातून या नोटीसीला उत्तर देणं आमदारांसाठी बंधनकारक आहे. उत्तर नाही दिलं तर आमदारांवर कारवाई होऊ शकते.

कायदेशीर पेच काय?

दरम्यान, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावरच दोन अपक्ष आमदारांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. अपक्ष आमदार महेश बालदी आणि विनोद अग्रवाल यांनी या प्रकरणी विधिमंडळ सचिवांची भेट घेऊन आमदारांना निलंबित करू नये, अशी मागणी करणारं पत्र दिलं आहे. त्यामुळे ते आमदारांना अपात्र ठरवू शकत नाहीत, असेही कायद्यातील जाणकार सांगत आहेत.

आमदार कोर्टात जाणार?

दरम्यान, बंडखोर आमदारांवरील या नोटिशीविरोधात आता एकनाथ शिंदे गट कोर्टात धाव घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. एक तर सोमवार संध्याकाळपर्यंत उपाध्यक्षांच्या नोटिशीला उत्तर देणं किंवा नोटिशीविरोधात कोर्टात धाव घेणं, हे दोन पर्याय आमदारांसमोर आहेत. काही काळजी करण्याचं कारण नाही. एवढी काही मोठी बाब नाही. निलंबन होणार नाही. आमचे कायदेशीर प्रयत्न सुरु आहेत.

नोटीस पाठवलेले आमदार कोण?

एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सामंत, यामिनी जाधव, संदिपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरनारे, चिमणराव पाटील या 16 आमदारांना विधानसभा उपाध्यक्षांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.

‘शिवसेना बाळासाहेब गट स्थापन’

मागील चार दिवसांपासून गुवाहटीत ठाण मांडून बसलेल्या एकनाथ शिंदे यांनी आज प्रथमच ठोस भूमिका जाहीर केली. आम्ही म्हणजेच शिवसेना असं सांगणाऱ्या शिंदे गटानं शिवसेना बाळासाहेब गट असे नाव नव्या गटाला दिले आहे. शिंदे यांच्या या गटाकडे 40 पेक्षा जास्त शिवसेना आमदार तर 8 पेक्षा जास्त अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेसाठीचा दावा केला जाईल, त्यावेळी या नव्या गटाचं संख्याबळ मोठी भूमिका बाजावेल.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें