पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला- जयंत पाटील

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील, असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही

पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला- जयंत पाटील

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधून केलेल्या भाषणातून महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला, अशा शब्दात ट्विटरवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. आजच्या भाषणात पंतप्रधान काही तरी नवीन सांगतील. कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील, असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही, असे ट्विट करत मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडलं आहे. (Jayant Patil on narendra modi)

दुसरीकडे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीसुद्धा पंतप्रधानांच्या भाषणावर नाराजी व्यक्त केली आहे. आपण देशातील जनतेला या संकटकाळात मदत कराल. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गरीब माणसाच्याही पाठीशी खंबीरपणे उभे राहाल, अशी अपेक्षा होती. आपण मात्र या संकट काळात जनतेला हलाखीच्या परिस्थितीत सोडलं आणि स्वतःच्या जबाबदारीपासून हात झटकले, अशी टीका काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करत कोरोना काळात काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सणांच्या या हंगामात बाजारपेठेतही पुन्हा एकदा गर्दी दिसत आहे. लॉकडाऊन गेला असला तरी अद्यापही कोरोना व्हायरस गेलेला नाही. गेल्या 7 ते 8 महिन्यांत देशातील प्रत्येक नागरिकानं भारताची परिस्थिती बिघडू न देण्यासाठी प्रयत्न केले आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. एका कठीण प्रसंगातून आपण पुढे जात आहोत, थोडासा निष्काळजीपणा आपल्या हालचाली थांबवू शकतो, आपल्या आनंदाला धुळीस मिळवू शकतो. जीवनातील जबाबदारी सांभाळणं आणि सतर्कता बाळगणं जेव्हा दोन्ही गोष्टी एकत्र केल्या जातील, तेव्हाच आयुष्यात आनंद टिकेल. दो गज दुरी, वेळोवेळी साबणाने हात धुवा आणि मास्क वापरा, असा सल्लाही पंतप्रधानांनी दिला आहे.देशात कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर चांगला आहे. आज देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण चांगलं आहे. मृत्यूचे प्रमाण कमी आहे. जगातील संपन्न देशांपेक्षा जास्तीत जास्त नागरिकांचे प्राण वाचविण्यात भारत यशस्वी होत आहे.

कोविड महामारीविरुद्धच्या लढाईत वाढत्या चाचण्या ही एक आपली मोठी शक्ती आहे. सेवा परमो धर्म: च्या मंत्रानं डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी नि:स्वार्थपणे एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सेवा देत आहेत. या सर्व प्रयत्नांत निष्काळजीपणाची ही वेळ नाही. कोरोना निघून गेला आहे किंवा कोरोनामुळे आता कोणताही धोका नाही, असे समजण्याची ही वेळ नाही. अलिकडच्या काळात, आम्ही सर्वजण अनेक छायाचित्रे, व्हिडीओ पाहिले आहेत, ज्यात हे स्पष्ट  दिसत आहे की, बर्‍याच लोकांनी आता खबरदारी घेणे थांबवले आहे हे योग्य नाही. जर आपण निष्काळजीपणा करत मास्कशिवाय बाहेर पडत असाल, तर आपण स्वत:ला आणि आपल्या कुटुंबास, आपल्या कुटुंबातील मुले, वृद्धांना संकटात टाकत आहात. आज अमेरिका असो वा युरोपातील इतर देश, या देशांमध्ये कोरोनाची प्रकरणं कमी होत होती, परंतु अचानक पुन्हा त्यात वाढ होऊ लागली आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केलं आहे.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

अमेरिका आणि युरोपातील कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, भारतीयांनी काळजी घ्यावी: नरेंद्र मोदी

कोरोना लस येताच प्रत्येक भारतीयापर्यंत जलद गतीने पोहोचवण्याची तयारी : नरेंद्र मोदी

(Jayant Patil on narendra modi)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *