…तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, पंकजा मुंडेंचा अप्रत्यक्षरीत्या निशाणा

करुणा शर्मा आणि रेणू शर्मा यांच्या प्रकरणात धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा, असंच पंकजा मुंडेंनी सुचवलंय. टीव्ही 9 मराठीकडे पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय

  • राहुल झोरी, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 17:27 PM, 1 Mar 2021
...तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, पंकजा मुंडेंचा अप्रत्यक्षरीत्या निशाणा
पंकजा मुंडे

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गाजत आहे. त्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामाही घेतलाय. विशेष म्हणजे अशाच एका प्रकरणात धनंजय मुंडेसुद्धा अडकले होते. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केलंय. करुणा शर्मा आणि रेणू शर्मा यांच्या प्रकरणात धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा, असंच पंकजा मुंडेंनी सुचवलंय. टीव्ही 9 मराठीकडे पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय, त्यावेळी त्या बोलत होत्या. पंकजा मुंडेंच्या या विधानानं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय. (Then Dhananjay Munde Should Resign, Indirectly Targeting Pankaja Munde)

व्यक्तिगतही मी या गोष्टीचं कधीच समर्थन करू शकत नाहीः पंकजा मुंडे

जर कोणावर अशा प्रकारचं बोट दाखवलं गेलंय. त्यांनीच स्वतःची भूमिका ही स्वतःहून घेतली पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. मग राजकीय जीवनामध्ये लोक त्यांच्याकडे मान उंचावून बघतील. व्यक्तिगतही मी या गोष्टीचं कधीच समर्थन करू शकत नाही. ज्यांच्यावर आरोप होतात, त्यांनीच भूमिका घ्यायला हवी, असंही भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्यात.

धनंजय मुंडेंचा निर्णय त्यांच्या पक्षाने घ्यावाः पंकजा मुंडे

धनंजय मुंडेंचा निर्णय त्यांच्या पक्षाने घ्यावा. त्यांनी भूमिका ही नैसर्गिक घ्यायला पाहिजे. धनंजय मुंडे प्रकरणाचं समर्थन करू शकत नाही. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही आमच्या पक्षाचीही मागणी आहे. राजकारणात काय पायंडे चाललेत ते स्त्रियांच्या दृष्टीने दुर्दैवी आहेत. झगडणाऱ्या स्त्रीसाठी, चांगला काम करणाऱ्या स्त्रीसाठी एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

‘आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या’, चंद्रकांत पाटलांच्या मागणीवर पंकजा मुंडेंची भूमिका काय?

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आलाय. आता करुणा शर्मा आणि रेणू शर्मा यांच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घ्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी “एका मंत्र्याच्या राजीनाम्याची एक निर्णयाची पायरी उशिराने का होईना ओलांडली आता निष्पक्षपातीपणे चौकशी चा डोंगर सरकारला ओलांडायचा आहे. सरकारच्या इतिहासात महिलांच्या बद्दल एवढा दुजाभाव आणि सामाजिक व्यवस्थेची इतकी दुरवस्था आपल्या महाराष्ट्राला शोभणारी नाही,” असं ट्विट केलं होतं. पंकजा मुंडे यांचं हे ट्विट म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या मागणीला पाठिंबाच असल्याचं बोललं जात होतं. अखेर आज पंकजा मुंडेंनी थेट धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, असं सुचवलं आहे.

संबंधित बातम्या :

‘तपास योग्य दिशेनंच, दोषीला कठोर शिक्षा देणार’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर; सीएम म्हणतात, तो काय फ्रेम करुन ठेवण्यासाठी नाही!

Then Dhananjay Munde Should Resign, Indirectly Targeting Pankaja Munde