Arnab Goswami Arrest : महाविकास आघाडी सरकारच्या असहिष्णुतेचा खरा चेहरा जगासमोर, आशिष शेलारांचं टीकास्र

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणारे आता शांत आहेत, प्रेस, सामान्य माणूस आणि नागरिक त्रस्त आहेत, असंही टीकास्त्रही त्यांनी ठाकरे सरकारवर सोडलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:07 AM, 4 Nov 2020

मुंबईः रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल पोलीस चौकशीसाठी आज त्यांच्या घरी पोहोचले असता, त्यांनी पोलिसांशी दीड तास हुज्जत घातली. त्यानंतर अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर भाजपा आमदार आशिष शेलारांनीही (Ashish Shelar)ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातल्या प्रेससाठी काळा दिवस असल्याचं आशिष शेलार म्हणाले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या असहिष्णुतेचा खरा चेहरा जगासमोर. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणारे आता शांत आहेत, प्रेस, सामान्य माणूस आणि नागरिक त्रस्त आहेत, असंही टीकास्त्रही त्यांनी ठाकरे सरकारवर सोडलं आहे. (Ashish Shelar On Arnab Goswami Arrested)

एका प्रकरणात राज्य सरकारला उघडे पाडले म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णीला अटक केली… सरकारविरोधात सोशल मिडियावर बोलणाऱ्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांसह सामान्य माणसाला ठेचून काढणे नित्याचेच झाले… आता सरकारला खडा सवाल विचारणाऱ्या संपादकाच्या हातात बेड्या… वा रे वा लोकशाही सरकार! काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार.. हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवाने, लोकशाहीचा आजचा काळा दिवस… महाराष्ट्र आणिबाणीच्या दिशेने?, असा टोलाही आशिष शेलारांनी लगावला आहे.


2018 सालात अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती, त्या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. यापूर्वी अर्णव गोस्वामी यांची चौकशी झाली होती, पण कारवाई झाली नव्हती. कलम 306 आणि 34 अंतर्गत अन्वय गोस्वामीला अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण ?
अन्वय नाईक (53) यांनी शनिवारी 5 मे 2018 रोजी अलिबाग तालुक्यातील कावीर येथील फार्म हाऊसवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांची आई कुमुद नाईक (84) त्यांचाही मृतदेह तेथेच आढळून आला होता. अन्वय नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरलं होतं.

संबंधित बातम्या

रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अर्णव गोस्वामींच्या अटकेवर केंद्राची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्र सरकारची कारवाई आणीबाणीसारखी: प्रकाश जावडेकर