सरकार टिकवायचं की नाही हे उद्धव ठाकरेंनी ठरवावं : प्रकाश आंबेडकर

सरकार टिकवायचं की नाही हे उद्धव ठाकरे यांनी ठरवावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

  • आश्विनी सातव डोके, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 15:33 PM, 14 Jan 2021
Prakash Ambedkar

पुणेः राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप झाल्यानं ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. शरद पवारांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला एक पक्ष म्हणून धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचा गांभीर्याने विचार करावा लागेल, असा गर्भित इशारा दिलाय. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनीही धनंजय मुंडेंच्या बलात्काराच्या आरोपांवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. (Uddhav Thackeray Should Decide Whether To Keep The Government Or Not Says Prakash Ambedkar)

सरकार टिकवायचं की नाही हे उद्धव ठाकरे यांनी ठरवावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. वंचित बहुजन आघाडीच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी मुफ्ती, मौलाना यांची भेट घेतली, त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय. मुंडे यांच्या राजीनामा हा कोर्टाचा विषय आहे, लोक निवडणूक आयोगाकडे का जातात?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. सरकार टिकवायचे की नाही हे उद्धव ठाकरेंनी ठरवायला हवं. शरद पवार म्हणाले हा गंभीर गुन्हा आहे हा कसा घ्यावा हे मुंडे यांनी ठरवावं.

राष्ट्रवादीला इब्रत राखायची असेल तर राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही: प्रकाश आंबेडकर

राष्ट्रवादीला इब्रत राखायची असेल तर राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही. राजकारणी ज्ञानी असतो पण काही साधायचे असेल तर तो अज्ञानाचे सोंग घेतो, असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवरही निशाणा साधलाय. 27 जानेवारीला संपूर्ण राज्यात वंचितच्या बॅनरखाली प्रत्येक जिल्ह्यात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम समाजाचे आंदोलन होणार असल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी अधोरेखित केलंय.

धनंजय मुंडेंकडून शरद पवारांची भेट

धनंजय मुंडेंनी बुधवारी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी सर्व माहिती दिल्याचं पवारांनी सांगितलं. ते म्हणाले, धनंजय मुंडे मला काल भेटले आणि आरोपाची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार काही व्यक्तींसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यातूनच या तक्रारी तयार झाल्या आहेत. याबाबत हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केली आहे. त्याबाबत कोर्टात सुनावणी होणं बाकी असल्याचं पवारांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाआधी पक्ष निर्णय घेईल : शरद पवार

धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपानंतर आता मुख्यमंत्री अद्याप निर्णय का घेत नाही असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. यावर बोलताना पवारांनी सांगितलं की, मुख्यमंत्री निर्णय घेण्याआधी धनंजय मुंडेंबाबत पक्षच निर्णय घेईल. मुंडेवरील आरोप गंभीर आहेत, त्यामुळे मला आधी माझा निर्णय घेऊ द्या, मुख्यमंत्र्यांचं नंतर बघू असं वक्तव्य पवारांनी आज केलं. पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वानुमते निर्णय होईल. त्यासाठी आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहण्याची गरज नाही. या निर्णयात कुणावर अन्याय होणार नाही हे पाहणं अधिक महत्त्वाचं असल्याचंही पवारांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

राजकारण्यांनी भान ठेवावं, धनंजय मुंडे प्रकरणात संजय राऊतांचं भाष्य

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला का? शरद पवार म्हणतात

Uddhav Thackeray Should Decide Whether To Keep The Government Or Not Says Prakash Ambedkar