मोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती

मध्यरात्रीनंतर एक ते दोन तासांत हवेली तालुक्यात तुफान पाऊस पडल्याचे सांगितले जात आहे.

मोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती

पुणे: पुण्यातील हवेली तालुक्यात रविवारी मध्यरात्रीनंतर ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्रीनंतर एक ते दोन तासांत हवेली तालुक्यात तुफान पाऊस पडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या उरूळी कांचन येथील मंडई पाण्याखाली गेली आहे. या भागातील रस्त्यांवरुन पाण्याचे अक्षरश: लोंढे वाहत आहेत. अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. प्राथमिक माहितीनुसार, हवेली तालुक्यातील सर्व परिसरांमध्ये साधारण हीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता याठिकाणी नेमके किती नुकसान झाले आहे, हे पाहावे लागेल. ( Cloudburst rain in Pune)

दरम्यान, हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस होण्याची अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे 21,22 आणि 23 ऑक्टोबरला महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. परिणामी ग्रामीण भागांतील नागरिकांसह शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.


दोन दिवसांपूर्वीच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणाला अतिवृष्टीचा तडाखा बसला होता. यामध्ये शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली होती. तर अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठी वित्तहानी झाली होती. लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने साठवलेले अन्नधान्यही भिजले होते. यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये बिकट परिस्थिती उद्भवली आहे. तर कोकणातही बहुतांश भातशेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने आणि पीक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर सध्या महाविकासआघाडी सरकार आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांकडून अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांचा दौरा केला जात आहे. रविवारी शरद पवार यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी लाहोरा आणि उमरगा परिसरातील गावांना भेटी दिल्या. तर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. काहीवेळापूर्वीच ते सोलापूरसाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

राज्यात पुन्हा जोरदार पावसाची हजेरी, उस्मानाबाद, तुळजापूर, रिसोडमध्ये मुसळधार पाऊस

Weather Alert: पुढच्या 24 तासांत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, हवामान खात्याचा इशारा

( Cloudburst rain in Pune)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *