पुण्यात भर दुपारी गोळीबार, रक्तबंबाळ अवस्थेत तरुणाची पोलीस ठाण्यात धाव

  • Sachin Patil
  • Published On - 18:37 PM, 31 Oct 2018

पुणे: पुण्यातील शुक्रवार पेठ आज दुपारी गोळीबाराच्या थराराने हादरली. शिंदे आळीमध्ये एका युवकावर भर दुपारी गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात जखमी झालेल्या मंगेश धुमाळने रक्तबंबाळ अवस्थेत खडक पोलीस ठाण्यात धाव घेतली.पोलिसांनी तातडीने त्याला ससून रुग्णालयात दाखल केलं. मात्र शुक्रवार पेठेसारख्या भागात दिवसा ढवळया गोळीबार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

मंगेश धुमाळवर दोघांनी गोळीबार केल्याचं सांगण्यात येत आहे. या गोळीबारानंतर धारदार शस्त्राने त्याचावर वारही झाला. गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी होती.

गोळीबार आणि वार झाल्याने जखमी झालेल्या मंगेशने जवळच असलेल्या खडक पोलीस ठाण्यात धाव घेतली. रक्‍ताने मंगेशचे कपडे माखलेले होते. पोलिसांना देखील त्याला पाहून काहीच सुचेनासे झाले होते. खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी आणि इतर अधिकार्‍यांनी जखमी झालेल्या मंगेश धुमाळ याला तात्काळ ससून रूग्णालयात दाखल केलं.

त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. पूर्ववैमनस्यातून मंगेश धुमाळवर गोळीबार झाल्याची चर्चा आहे. मात्र, कोणी आणि कशासाठी गोळीबार केला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. खडक पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.