स्वस्तात अमेरिकन डॉलर देणाचं आमिष, पुण्यात टोळी गजाआड

स्वस्तात अमेरिकन डॉलर देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. यात 4 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

स्वस्तात अमेरिकन डॉलर देणाचं आमिष, पुण्यात टोळी गजाआड

पुणे : स्वस्तात अमेरिकन डॉलर देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात पुणे पोलिसांना यश  आले आहे. फरासखाना पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून ही कारवाई केली. यात 4 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

बबलू हरेश शेख (वय 45, रा. दिल्ली), सेतु आबु मतुबूर (वय 20, रा. गुवाहाटी, आसाम), सिंतू मुतालिक शेख (वय 36, रा. अजमेर, राजस्थान), रिदोई महमंद रहीम खान (वय 19, रा. नवी दिल्ली) असे या 4 आरोपींची नावे आहेत. तसेच आरोपींपैकी कबीर इस्माईल शेख आणि झांगी नावाची महिला फरार झाली आहे. या प्रकरणी आशिष विजय चव्हाण (वय 39, रा. आंबेगाव खुर्द), यांनी तक्रार दिली होती.

70 रुपये किमतीची डॉलरची नोट 30 रुपयात देण्याचे आमिष

तक्रारदार आशिष यांचे बुधवार पेठ येथे चप्पल बुट-विक्रीचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी बबलू त्यांच्या दुकानात बूट खरेदी करण्यासाठी आला होता. त्याने साडेसातशे रुपयांचे स्पोर्ट्स शूज विकत घेतले. शुजचे पैसे दिल्यावर त्याने 20 डॉलरची नोट दाखवून आशिष यांना ती तुमच्याकडे चालते का विचारले. आशिष यांनी नकार दिला. यावेळी आरोपी बबलू याने या डॉलरची किंमत 70 रुपये असून मी तुम्हाला ती 30 रुपयात देतो असे सांगितले. तसेच खिशातील आणखी डॉलरच्या नोटा काढून त्यातील एक नोट आशिष यांना देऊन स्वतःचा फोन नंबरही दिला.

500 डॉलर मिळवण्याच्या नादात दीड लाखांची फसवणूक

आशिष यांनी आपल्या परिचितांकडून ही नोट खरी आहे का? याची खात्री केली. त्यानंतर आरोपी बबलूने 6 जूनला आशिषला डॉलर पाहण्यासाठी दांडेकर पुलाजवळ बोलावले. त्याने आशिषला कॅनॉलकडे नेऊन तेथे अमेरिकन डॉलर दाखवले. त्यावर आशिषचा विश्वास बसल्याने त्यांच्यात दीड लाख रुपयात 500 डॉलर देण्याचा व्यवहार ठरला. ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे 8 जूनला आरोपी श्रीकृष्ण टॉकिज (बुधवार पेठ, पुणे) येथे आला. त्याने आशिष यांना फोन करून डॉलर आणल्याचे सांगितले. त्याप्रमाणे आशिष श्रीकृष्ण टॉकिजजवळ गेले असता आरोपीने अमेरिकन डॉलर असलेली कॅरीबॅग आशिष यांना दिली आणि त्यांच्याकडून दीड लाख रुपये घेऊन निघून गेला. आशिष यांनी दुकानात येऊन कॅरिबॅग पाहिली असता त्यात त्यांना फक्त 20 डॉलरची एक नोट मिळाली, बाकी सगळे कागदी गुंडाळे असल्याचे दिसून आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित आशिष यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पुणे शहरात तब्बल 70 जणांची टोळी फिरत असल्याचा संशय

सीसीटीव्हीच्या आधारे फुटेज मिळवून आशिष यांना दाखवले असता त्याने आरोपी बबलूला ओळखले. त्याआधारे तपास करताना फरासखाना पोलिसांना आरोपी जनता वसाहत दांडेकर पूल येथे असल्याची गुप्त बातमी मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी आरोपींवर छापा टाकला. यावेळी आरोपींनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करत चौघांना अटक केली. अन्य 2 आरोपी फरार झाले आहेत. अशाप्रकारे तब्बल 70 जणांची टोळी पुणे शहरात फिरत असल्याचे सांगत पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *