जगताप-लांडगे टेन्शनमध्ये, शेवटच्या 10 मिनिटात पिंपरीत भाजपचा महापौरपदाचा अर्ज

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून उषा उर्फ माई ढोरे यांचा महापौरपदासाठी तर तुषार हिंगे यांचा उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला.

जगताप-लांडगे टेन्शनमध्ये, शेवटच्या 10 मिनिटात पिंपरीत भाजपचा महापौरपदाचा अर्ज

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एकहाती सत्ता असतानाही भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण होतं. भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे टेन्शनमध्ये होते. अखेर, शेवटची दहा मिनिटं बाकी असताना भाजपने महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज (Pimpri Chinchwad Mayor Election) दाखल केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्याचा काल (सोमवारी) शेवटचा दिवस होता. यावेळी महानगरपालिकेत नाट्य पाहायला मिळालं. पालिकेत एकहाती सत्ता असतानाही सत्ताधारी भाजपला महापौरपदाच्या निवडणुकीत बंडखोरी होण्याची भीती होती. त्यामुळे त्यांना शेवटच्या क्षणी अर्ज भरावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसनेही उमेदवार देत आव्हान देण्याचा प्रयत्न केला.

पुणे महापौर निवडणुकीत ट्विस्ट, महासेनाआघाडी रिंगणात, भाजपचाही उमेदवार जाहीर!

पिंपरी चिंचवडजवळ असलेल्या पुणे शहरात भाजपने कसलाही गोंधळ होऊ न देता सकाळी 11 वाजताच्या सुमारासच महापौरपदाचा अर्ज दाखल केला. पण पिंपरी चिंचवडमध्ये मात्र मोठं संख्याबळ असतानाही महापौरपदासाठी प्रचंड गोंधळ निर्माण झाला.

सर्वसाधारण महिला खुल्या गटासाठी राखीव असलेल्या महापौरपदासाठी तब्बल चौघी जण इच्छुक होत्या. शेवटची दहा मिनिटं राहिली असतानाही नावावर एकमत होत नव्हतं. अखेरच्या क्षणी तर लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव दिसत होता. अखेर उषा उर्फ माई ढोरे यांचा महापौरपदासाठी तर तुषार हिंगे यांचा उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला.

एवढा गोंधळ झाला असला तरी नेहमीप्रमाणे आलबेल असल्याचं भाजपकडून सांगितलं गेलं. भाजपने आम्हीच निवडून येऊ, असा दावा केला. दुसरीकडे राष्ट्रवादीने आम्ही चमत्कार करु असा दावा करत महापौरपदासाठी माई काटे तर उपमहापौरपदासाठी राजू बनसोडे यांचे अर्ज दाखल केले आहेत.

एकूणच काय तर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडे पुरेसे संख्याबळ असतानाही महापौरपदासाठी गोंधळ निर्माण झाला. एवढंच नाही तर नाराजी दूर करण्यासाठी येत्या दोन वर्षात तीन महिला महापौर करु असं आश्वासन देत वेळ मारुन नेण्याची नामुष्की भाजपवर आली. एकूणच काय तर राज्य पातळीवर सुरु असलेल्या महाशिवआघाडीचा परिणाम पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad Mayor Election) झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *