पुणे-पिंपरीतील वाहनांना टोलमाफी, खेड शिवापूर टोलनाका विरोधातील आंदोलन मागे

आठ दिवस एमएच 12 आणि एमएच 14 पासिंगचे वाहने मोफत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पुण्याहून सातार्‍याला जाताना दोन मार्गिका आणि तिकडून येताना दोन मार्गिका उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.

Pune and Pimpri vehicles will not pay toll, पुणे-पिंपरीतील वाहनांना टोलमाफी, खेड शिवापूर टोलनाका विरोधातील आंदोलन मागे

पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या आश्वासनानंतर खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने आंदोलन मागे घेतलं आहे. या आंदोलनाला आज पहिल्या टप्प्यात यश आलं आहे. टोल नाक्यावर चर्चा करण्यासाठी कृती समितीचे शिष्ठमंडळ, सुप्रिया सुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात पुढील आठवड्यात चर्चा होणार आहे. तोपर्यंत आठ दिवसासाठी भोर, वेल्ला, मुळशी, खडकवासला, हवेली, पुरंदर आणि पुणे भागातील वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे (Pune and Pimpri vehicles will not pay toll). मात्र टोल नाका हटत नाही तोपर्यंत विरोध कायम असल्याचं कृती समितीन म्हटलं आहे.

टोल नाक्यावर सकाळपासूनच आंदोलनाची धग जाणवत होती. आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर लोकप्रतिनिधी, कृती समिती, टोल नाका प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यानुसार आठ दिवस एमएच 12 आणि एमएच 14 पासिंगच्या वाहने मोफत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पुण्याहून सातार्‍याला जाताना दोन मार्गिका आणि तिकडून येताना दोन मार्गिका उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.

खेड-शिवापूर मार्गावर पीएस टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा टोल नाका आहे. या टोल नाक्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर बैठक होणार आहे. पुढील आठवड्यात टोल नाका हटाव कृती समितीचे शिष्टमंडळ, खासदार सुप्रिया सुळे आणि गडकरी यांच्यात चर्चा होणार आहे. या चर्चेत टोल नाका पीएमआरडीएच्या बाहेर हटवण्यावर चर्चा होणार आहे. आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. मात्र, टोल नाका हटला नाहीतर पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.

खेड-शिवापूर टोल नाक्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. टोल नाका हटवण्यासाठी खेड शिवापूर टोल नाका हटाव कृती समिती आक्रमक झाली आहे. या कृती समितीचं आज सकाळी दहा वाजेपासून धरणे आंदोलन सुरु होतं. दरम्यान, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी पर्यायी रस्त्याची व्यवस्था केली होती.

पुणे-सातारा या मार्गावर साधारण 140 किलोमीटरचा हा मार्ग आहे. देहू रोडपासून आनेवाडी टोल नाकेपर्यंत हा मार्ग आहे. रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या मालकीचा हा टोलनाका आहे. मात्र या टोल नाक्यासंदर्भात कृती समितीचे अनेक आक्षेप आहेत (Pune and Pimpri vehicles will not pay toll).

खेड-शिवापूर टोल नाक्याबाबत समितीचा काय आक्षेप?

  • टोल नाका पीएमआरडीच्या हद्दीबाहेर हटवावा
  • अनेक ठिकाणी रस्त्याचं अपूर्ण काम
  • या मार्गावरील सर्विस रोड अपूर्ण
  • या मार्गावरील पंधरा भुयारी मार्ग अपूर्ण असून अनेक मार्गांच्या जागा चुकल्या
  • रस्ता दुभाजकामध्ये झाडांची लागवड नाही
  • या मार्गावर मार्गावरील फ्लायओवर लाईटची सुविधा नाही
  • या मार्गाचं निकृष्ट काम झाल्याचा कृती समितीचा आरोप
  • काम अपूर्ण असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्यामुळे या अपघातप्रकरणी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कृती समितीने केली.

खेड-शिवापूर टोल नाक्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून चिघळला आहे. या टोल नाक्यावर तात्पुरता निर्णय झाला आहे. मात्र अंतिम निर्णय अद्यापही बाकी आहे. त्यामुळे खेड-शिवापूरच्या टोलनाक्याची टोलवाटोलवी अजूनही सुरु आहे. आजचं मरण उद्यावर गेले एवढेच सध्या तरी म्हणावे लागेल. या टोल नाक्यासारखीच राज्यातील इतर टोलनाक्यांची अवस्था आहे. त्यामुळे राज्यातील एकूणच टोलनाक्यांचं फेरआढावा घेऊन धोरण ठरवण्याची गरज आहे. नाहीतर तर टोलधाड अपघात आणि मृत्यूंची मालिका सुरुच राहणार.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *