येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह मराठवाड्यात दमदार पावसाची शक्यता

महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या शेवटी अखेर पासवाचं पुनरागमन झालं आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे.

येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह मराठवाड्यात दमदार पावसाची शक्यता

पुणे : मान्सून येऊन महिना उलटला. मात्र, कोकण सोडलं तर महाराष्ट्रात इतर कुठेही हवा तसा पाऊस पडला नाही. दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि विदर्भात तर पुन्हा एकदा मोठ्या दुष्काळाची चिन्हे दिसू लागली होती. मात्र, महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या शेवटी अखेर पासवाचं पुनरागमन झालं आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे.

उत्तर महाराष्ट्रात असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे उत्तर कोकण, गुजरातमध्ये पावसाला पोषक हवामान निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मध्य-महाराष्ट्रासह दुष्काळी झळा सोसणाऱ्या मराठवाड्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याची माहिती पुणे हवामान खात्याने दिली. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये राज्यात चांगला पाऊस होऊ शकतो.

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये विश्रांती घेतली होती. मात्र, 20 जुलैपासून मराठवाड्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे दुष्काळाचे सावट असलेल्या मराठवाड्याला थोडा दिलासा मिळाला आहे. तसेच येत्या आठवड्याभरात मराठवाड्यात दमदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानंतर आता राज्यातील इतर भागांतही पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. गेल्या 24 तासांत राज्यातील अनेक भागात पाऊस झाला. मुंबईत उशिरा रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली.

जालना जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. पावसामुळे जुई धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सांडव्यावरुन पाणी वाहू लागले. त्यामुळे जुई नदीला पूर आल्याचं चित्र आहे. तसेच, जिल्ह्यातील उंडनगाव, गोळेगाव, अण्वा पाडा, अण्वा, वाकडी-कुकडी, कठोरा बाजार भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. तर भोकरदन तालुक्यात 10 दिवसाच्या विश्रांतीनंतर पाऊस बरसला. या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी सुखावला आहे.

मान्सूनचा पहिला पाऊस चांगला बरसला. त्यानंतर पावसाने उसंत घेतली. यंदातरी चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, पावसाने दुष्काळग्रस्त मराठावाडा, विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राकडे पाठ फिरवली आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली. पावसाअभावी शेतातील पीकंही करपली होती. मात्र, आता राज्यात पावसाचं पुनरागमन झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.

VIDEO :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *