'सोनेरी आमदार' दिवंगत रमेश वांजळेंच्या मुलीचं लग्न ठरलं!

मनसेचे सोनेरी आमदार दिवंगत रमेश वांजळे यांना कोण नाही ओळखत? अंगावर अडीच किलोंच्या सोन्याच्या दागिन्यांमुळे बांद्यापासून चांद्यापर्यंत हर एका माणसाला ‘रमेश वांजळे’ हे केवळ नावच नव्हे, तर नावासह नजरेसमोर करारी बाण्याचा ‘सोनेरी’ धिप्पाड माणूस उभा राहतो. बोटातल्या अंगठीत राज ठाकरेंची प्रतिमा नि गळ्यातल्या लॉकेटमध्येही राज ठाकरेच, अशा निष्ठावंत आमदाराने अल्पावधितच ‘डॅशिंग आमदार’ म्हणून नाव कमावलं …

'सोनेरी आमदार' दिवंगत रमेश वांजळेंच्या मुलीचं लग्न ठरलं!

मनसेचे सोनेरी आमदार दिवंगत रमेश वांजळे यांना कोण नाही ओळखत? अंगावर अडीच किलोंच्या सोन्याच्या दागिन्यांमुळे बांद्यापासून चांद्यापर्यंत हर एका माणसाला ‘रमेश वांजळे’ हे केवळ नावच नव्हे, तर नावासह नजरेसमोर करारी बाण्याचा ‘सोनेरी’ धिप्पाड माणूस उभा राहतो. बोटातल्या अंगठीत राज ठाकरेंची प्रतिमा नि गळ्यातल्या लॉकेटमध्येही राज ठाकरेच, अशा निष्ठावंत आमदाराने अल्पावधितच ‘डॅशिंग आमदार’ म्हणून नाव कमावलं होतं. हिंदीतून शपथ घेणाऱ्या अबू आझमींचा माईक हिसकावून आपला आक्रमकपणा विधानसभेच्या पहिल्याच दिवशी दाखवणाऱ्या या सोनेरी आमदाराला अवघा महाराष्ट्र ओळखत होता.

पुण्याच्या हवेली तालुक्यातील अहिरे गावचे सरपंच, हवेली तालुका पंचायत समिती सदस्य ते अगदी विधानसभेतील आमदार…असा 25 वर्षांचा राजकीय प्रवास करणाऱ्या रमेश वांजळे यांचा 2011 च्या जून महिन्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. रमेश वांजळे यांच्या अकाली निधनाने राजकारणापलिकडचा दिलदार माणूस हरपल्याची भावना अवघ्या मराठी माणसांच्या मनात होती आणि आहे.

दिवंगत रमेश वांजळे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांनी 2011 साली खडकवासला मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढल्या. दिवंगत रमेश वांजळे यांना आदरांजली म्हणून मनसेने हर्षदा वांजळेंविरोधात उमेदवार दिला नव्हता. मात्र, त्यात भाजपच्या भीमराव तपकीर यांनी त्यांचा पराभव केला.

त्यानंतर रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे यांनीही राजकारणात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सायली या 2014 साली पुणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि विजयी सुद्धा झाल्या. वारजे प्रभागातून निवडून आल्या. वयाच्या 22 व्या वर्षी सायली पुणे महापालिकेत सर्वात तरुण नगरसेविका म्हणून निवडून आल्या. अत्यंत हुशार, कुशाग्र बुद्धीच्या आणि लोकांमध्ये मिसळणाऱ्या सायली या महापालिकेच्या बालकल्याण समितीच्या सदस्या, शहर सुधारणा समितीच्या सदस्याही आहेत.

राजकारणात वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवणाऱ्या सायली वांजळे यांनी राजकारणात आता बऱ्यापैकी जम बसवला आहे. दिलदार वडिलांसारख्याच सायलीही दिलदार मनाच्या आहेत, अशी त्यांची ख्याती आहे. सढळ हाताने नागरिकांना मदत करण्याचे वडिलांचं गुण सायली यांच्यातही उतरल्याचे खडकवासल्यातील वयोवृद्ध सांगतात.

सायली रमेश वांजळे यांचं आता लग्न ठरलं आहे. भोसरी येथील आदित्य नथु शिंदे यांच्याशी सायली यांचा विवाह होणार आहे. चारच दिवसांपूर्वी म्हणजे 14 डिसेंबर 2018 रोजी सायली आणि आदित्य यांचा साखरपुडा पार पडला. लवकरच दोघांची लगीनगाठ बांधली जाणार आहे. त्यामुळे अर्थात सायली सासरी निघून जातील. मात्र, विशेष गोष्ट म्हणजे, सायली या सासरीही राजकारणात सक्रीय राहणार असल्याचे कळते आहे.

सायली यांचे होणारे पती म्हणजे आदित्य शिंदे हे उद्योजक आहेत. आमदार महेश लांडगे यांचे आदित्य हे चुलत भाचे आहेत. तसेच, आदित्य यांचे वडील नथु शिंदे यांनी 2002 मध्ये भोसरी मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. त्यामुळे सायली यांच्या सासरीही राजकीय घराणे आहे. त्यामुळे त्यांना पुढेही राजकारणत सक्रीय राहण्यास अडथळे येणार नसल्याचे म्हटले जात आहे.

सायली यांनी त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप जाहीर केली नाही. मात्र, लग्नानंतरही त्या राजकारणात सक्रीय राहत असल्याने खडकवासला मतदारसंघातील थोरा-मोठ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दिवंगत रामेश वांजळे यांच्या समाजसेवेचा वसा सायली लग्नानंतरही पुढे सुरु ठेवतील, अशी आशा व्यक्त करत, अनेकांनी सायली यांच्या पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद आणि सदिच्छा दिल्या आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *