‘लिव्ह इन’ पार्टनरचं लग्न ठरल्याने तरुणीची आत्महत्या

  • Namdev Anjana
  • Published On - 17:46 PM, 15 Nov 2018

सचिन चपळगावकर, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाने लग्ना करण्यास नकार दिल्याने, निराश झालेल्या 23 वर्षीय तरुणीने इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सांगवी परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी गेल्या तीन वर्षांपासून आयटीतील तरुणासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती. तरुणाचे नुकतेच लग्न ठरले असल्याने तरुणी निराश झाली होती. ‘माझ्याशी लग्न कर’ अस वारंवार सांगूनही तरुणाकडून तिला प्रतिसाद मिळत नव्हता आणि त्याच कारणातून तिने हे टोकाचं पाऊल उचललं.

धक्कादायक म्हणजे, ज्या तरुणासोबत मुलगी राहायची, त्याच्याच घरच्या टेरेसवर जाऊन तिने उडी मारली. त्यानंतर तिला  उपचारासाठी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणीचा मृत्यू झाला.

काही दिवसांपूर्वी सांगवी परिसरातच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने चाकू हल्ला करत, त्याच्याच मैत्रिणीला तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर स्वत:च्या हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणातील दोघांवरही उपचार सुरु आहेत आणि आता काही दिवसांच्या अवधीने ही दुसरी घटना समोर आल्याने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.