पुण्याचा पुढील महापौर कोण? भाजप नगरसेवकांमध्ये चढाओढ

पुणे महापालिकेचे महापौरपद (Next mayor of PMC) पुढील अडीच वर्षांसाठी खुल्या सर्वसाधारण वर्गासाठी असणार आहे.

पुण्याचा पुढील महापौर कोण? भाजप नगरसेवकांमध्ये चढाओढ

पुणे: पुणे महापालिकेचे महापौरपद (Next mayor of PMC) पुढील अडीच वर्षांसाठी खुल्या सर्वसाधारण वर्गासाठी असणार आहे. त्यामुळे महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या वाढणार आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजपमध्ये मोठी चढाओढ दिसून येत आहे. 22 नोव्हेंबरला महापौरपदासह उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यावेळी महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार (Next mayor of PMC) हे पाहावे लागणार आहे.

पुण्यासह राज्यातील 27 महापालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी मुंबईत काढण्यात आली. त्यात पुणे महापालिकेचे महापौरपदासाठी खुल्या सर्वसाधारण वर्गाचं आरक्षण निघालं. त्यामुळे सत्ताधारी भाजपमधून महापौरपदासाठी कोणत्याही प्रवर्गातील नगरसेवकांना ही संधी मिळू शकते. पालिकेत भाजपची तब्बल 99 नगरसेवकांसह एकहाती सत्ता आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्याही मोठी आहे. मात्र, या पदावर भाजपकडून अनुभवी नगरसेवकालाच संधी मिळणार असल्याचे बोललं जात आहे.

भाजपमधील अनुभवी नगरसेवकांमध्ये प्रामुख्याने स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक मुरलीधर मोहोळे यांचं नाव महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. विधानसभा निवडणूकीत कोथरुड मतदारसंघातून निवडणूकीची जोरदार तयारी केलेल्या मोहोळ यांना प्रदेशाध्यक्षांच्या उमेदवारीमुळे माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे महापौरपदाच्या माध्यमातून त्याची भरपाई होण्याची अधिक शक्यता आहे. याशिवाय अन्य इच्छुकांमध्ये नगरसेवक हेमंत रासणे, श्रीनाथ भिमाले, वर्षा तापकीर, श्रीकांत जगताप, धीरज घाटे, राजेंद्र शिळीमकर आदींचा समावेश आहे.

भाजपमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असली तरी पक्ष ठरवेल त्यालाच महापौर पदावर संधी देण्यात येईल, असं भाजपच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. महापौर पदावरून भाजपमध्ये कोणाचीही नाराजी नसल्याचा दावा भाजपचे नेते करत आहेत.

अडीच वर्षांमध्ये पुन्हा खुल्या गटाला संधी

मागील टर्ममध्ये म्हणजेच 2015 मध्ये महापौरपदासाठी खुल्या सर्वसाधारण गटाचे आरक्षण निघाले. त्यावेळी दत्ता धनकवडे आणि प्रशांत जगताप यांना महापौरपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर खुल्या महिला प्रवर्गाचे आरक्षण निघाले. त्यात मुक्ता टिळकांना महापौरपदाची संधी मिळाली. आता मागासवर्ग अथवा इतर मागासवर्गाचे आरक्षण निघण्याची शक्यता असताना पुन्हा खुल्या गटाचे आरक्षण निघाले आहे. दरम्यान विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांची तीन महिन्यांची वाढीव मुदत येत्या 21 नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक 22 नोव्हेंबरला होणार असल्याचं महापालिकेने नगरसचिव सुनील पारखी यांनी सांगितले. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित केला जाईन असंही पारखी यांनी सांगितलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *