एबी डिव्हिलियर्स आणि मी राम-लखनसारखे : विराट कोहली

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:54 PM, 4 May 2019

नवी दिल्ली : दरवर्षीप्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला यंदाही निराशा हाती लागली आणि यंदाच्या आयपीएलमधून बाहेर होणारा हा पहिला संघ ठरला. पण कर्णधार विराट कोहली आणि दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्स यांचा फॉर्म संघासाठी जमेची बाजू राहिला. आमची जोडी ही राम-लखनसारखी असल्याचं विराटने म्हटलंय. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध या मोसमातला अखेरचा सामना खेळण्यापूर्वी विराट बोलत होता. आमची मैत्री कधीही तुटू शकत नाही, असं तो म्हणाला.

अगोदर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू मार्कस स्टॉयनिस आता बंगळुरुच्या ताफ्यात दाखल झालाय. स्टॉयनिस आणि एबी यांची चांगली मैत्री असल्याचंही बोललं जातं. यावरही विराटने उत्तर दिलं. स्टॉयनिस हा चांगला खेळाडू आहे, पण एबी आणि त्याचे विचार वेगळे आहेत, असं विराट म्हणाला.

“एबी आणि मी राम-लखनसारखे आहोत. आम्ही भाऊ आहोत. कुणीही आमची मैत्री तोडू शकत नाही. स्टॉयनिस हा देखील आणखी एक चांगला मित्र असून माणूस म्हणूनही तो अत्यंत चांगला आहे. पण एबीपेक्षा त्याचे विचार वेगळे आहेत,” असं विराटने सांगितलं.

विराट कोहलीला कर्णधार म्हणून यश मिळालं नसलं तरी तो जबरदस्त फॉर्मात होता. या मोसमात त्याने 14 सामन्यांमध्ये (13 इनिंग) 448 धावा केल्या आहेत. तो यावेळी बंगळुरुचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्यानंतर एबीचा नंबर लागतो. एबीने 12 इनिंगमध्ये 441 धावा केल्या आहेत. या मोसमातील आरसीबीचा अखेरचा सामना हैदराबादविरुद्ध होतोय, पण या जोडीला मोठी भागीदारी करण्यात अपयश आलं.

बंगळुरुला या मोसमात समाधानकारक यश मिळवता आलं नाही. त्यामुळे विराटने चाहत्यांसाठी एक संदेश जारी केला होता. शिवाय चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल त्याने आभारही मानले होते.