
अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल दोघे भारतीय क्रिकेटचे भविष्य आहेत. दोघे पुढचे मोठे स्टार आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये काही समानता आहेत. पहिली गोष्ट म्हणजे दोघे बालपणीचे मित्र आहेत. दोघे वयाच्या 13-14 व्या वर्षापासून एकत्र क्रिकेट खेळतायत. मैत्रीशिवाय दोघेही एकाच गुरुचे शिष्य आहेत. त्या गुरुच नाव आहे, युवराज सिंह. ऑस्ट्रेलियातून समोर आलेल्या आपल्या दोन्ही शिष्यांचे फोटो पाहिल्यानंतर युवराज नाराज झालेत. भडकलेल्या युवराजने दोघांना बुटांची भिती दाखवली.
T20 सीरीजसाठी टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. 5 सामन्यांच्या टी 20 सीरीजमध्ये दोन्ही टीम्स सध्या 1-1 बरोबरीत आहे. चौथा T20 सामना गोल्ड कोस्ट येथे 6 नोव्हेंबरला होणार आहे. त्याआधी अभिषेक आणि शुबमन गोल्ड कोस्टच्या समुद्र किनारी मजा मस्ती करण्यासाठी पोहोचले. दोघांनी तिथे भरपूर मजा केली. शर्टलेस होऊन समुद्रात उतरले.
जूती लावां दोना दे
अभिषेक शर्माने जेव्हा बीचवरचे शुबमन गिलसोबतचे मजा मस्तीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले, त्यावर युवराज सिंह आनंदी होण्याऐवजी उलट भडकला. अभिषेकच्या पोस्टवर कमेंट करताना पंजाबीमध्ये लिहिलं, जूती लावां दोना दे म्हणजे दोघांना बुटाने मारेन.
गिलच प्रदर्शन अजून तसं खास राहिलेलं नाही
युवराज सिंहने आपल्या शिष्यांना मस्करीत बुटांची भिती दाखवली. अभिषेक शर्मा आणि युवराज सिंह दोघे स्टार फलंदाज आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 सीरीजमध्ये त्यांच्यावर ओपनिंगची जबाबदारी आहे. सीरीजमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांपैकी एका मॅचमध्ये त्याने अर्धशतक झळकावलं. शुबमन गिलच प्रदर्शन अजून तसं खास राहिलेलं नाही.
उर्वरित दोन सामने जिंकणं आवश्यक
भारताला T20 सीरीज जिंकण्यासाठी उर्वरित दोन सामने जिंकणं आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियासमोर सुद्धा हेच आव्हान असेल. एका गुरुच्या नात्याने युवराज सिंह यांना सुद्धा असच वाटत असेल, शिष्यांनी मजा-मस्ती करणं ठीक आहे. पण भारताला त्यांनी सीरीज जिंकून द्यावी. एकेकाळी युवराज सिंह आपल्या बळावर टीम इंडियाला विजय मिळवून द्यायचा.