गांगुलीनंतर सचिन तेंडुलकर आणि लक्ष्मणकडून BCCI ने लेखी उत्तर मागितले

गांगुलीनंतर सचिन तेंडुलकर आणि लक्ष्मणकडून BCCI ने लेखी उत्तर मागितले


नवी दिल्ली : बीसीसीआयचे (BCCI) लोकपाल न्यायमूर्ती डी. के. जैन यांनी माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मणला नोटीस बजावली आहे. हितसंबंधांतील संघर्षाच्या मुद्द्यावर त्यांच्याकडून लेखी उत्तर मागण्यात आले आहे. सचिन तेंडुलकर आणि लक्ष्मण भारतीय क्रिकेट सल्लागार समितीचे (CAC) सदस्य आहेत. तसेच आयपीएलच्या फ्रँचायजचेही मेंटॉर आहेत. त्यामुळेच ही नोटीस बजावण्यात आली.

सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्स आणि लक्ष्मण सनरायजर्स हैदराबाद आयपीएल संघाचा मेंटॉर आहे. हितसंबंधांचे हे तिसरे प्रकरण आहे. याआधी सौरव गांगुलीलाही अशीच नोटीस पाठवण्यात आली होती. गांगुली सद्यस्थितीत 3 पदांवर काम करत आहे. गांगुली पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनचा (CAB) अध्यक्ष आहे. तसेच तो क्रिकेट सल्लागार समितीचा (CAC) सदस्य आणि दिल्ली कॅपिटल्सचा सल्लागारही आहे. 2017 मध्ये रवी शास्त्रीची राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. ही निवड या तिन्ही माजी क्रिकेटर सदस्य असलेल्या CAC नेच केली होती.

BCCI मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन तेंडुलकरचा मुंबई इंडियन्ससोबत कोणताही आर्थिक करार झालेला नाही. तिन्ही खेळाडू CAC चे सदस्य म्हणून स्वेच्छेने काम करत आहेत. गांगुलीला नोटीस पाठवण्यात आली. त्यामुळेच लोकपालांनी तेंडुलकर आणि लक्ष्मणलाही नोटीस पाठवल्याचे बोलले जात आहे. सचिन मुंबई इंडियन्सकडून एक रुपयाही घेत नाही. ते काम तो स्वेच्छेने करतो. CAC चा सदस्य म्हणूनही तो BCCI कडून कोणतेही पैसे घेत नाही, असेही सांगण्यात येत आहे.

न्यायमूर्ती डी. के. जैन यांनी सचिन तेंडुलकर आणि लक्ष्मणला या नोटीसवर 28 एप्रिलपर्यंत लेखी उत्तर देण्यास सांगितले आहे. या प्रकरणावर BCCI कडूनही उत्तर मागण्यात आले आहे. याबाबत मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांनी तक्रार दाखल केली होती. बुधवारी (24 एप्रिल) आपला 46 वा जन्मदिन साजरा करणाऱ्या सचिन तेंडुलकरची यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI