Video : IPL 2021 स्थगितीनंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सची बऱ्याच महिन्यानंतर कुटुंबाशी भेट, डोळ्यात पाणी…

Video : IPL 2021 स्थगितीनंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सची बऱ्याच महिन्यानंतर कुटुंबाशी भेट, डोळ्यात पाणी...
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स

सिडनी : कोरोनाच्या उद्रेकानंतर 4 मे रोजी IPL 2021 स्थगित करण्यात आली. त्यानंतर सर्व परदेशी खेळाडूंना आपआपल्या मायदेशी जाण्याची सोय बीसीसीआयने केली. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मायदेशी परतले खरे, मात्र विलगीकरणाच्या नियमांचे पालन करुन 26 दिवसांनी 30 मे रोजी त्यांची कुटुंबियांशी भेट झाली. या भेटीदरम्यान सर्वच खेळाडू कमालीचे इमोशनल झाले होते. त्यातील कोलकाता नाईट रायडर्सच्या पॅट कमिन्सचा (Pat Cummins) इमोशनल व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. (After IPL 2021 Suspended Australian Players Met Family got Emotional)

डेव्हिड वॉर्नर (David Warner), स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), ग्लेन मॅक्सवेल(Glen Maxwell), पॅट कमिन्स (Pat Cummins) अशा दिग्गज खेळाडूंसोबत ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू जे आयपीएलमध्ये कॉमेन्टीटर किंवा कोच म्हणून आले होते. ते देखील आयपीएल स्थगितीनंतर मायदेशी परतले. हे सर्वजण सिडनीतील एका हॉटेलमध्ये विलगीकरणात होते. विलगीकरण संपवून 30 मे रोजी सर्वजण आपल्या घरातल्यांना भेटले. त्यावेळी सर्वांचेच डोळे पाणावले होते.  दरम्यान वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सलाही भावना अनावर झाल्या, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्याच्या इमोशनल व्हिडिओतून हे दिसून येत आहे.

पॅट कमिन्स उर्वरीत IPL खेळणार नाही

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने उर्वरीत आयपीएलचे सामने (IPL 2021) सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे होणार असल्याची माहिती दिली. दरम्यान सामन्यांचे ठिकाण आणि वेळ बदलल्याने बऱ्याच परदेशी खेळाडूंच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सर्वात महत्त्वाचा गोलंदाज पॅट कमिन्सही उर्वरीत सामन्यांसाठी युएईला जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे. ऑस्ट्रेलियातील काही माध्यमांनी हा दावा केला आहे.

लवकरच होणार ताटातूट

नुकतेच घरच्यांशी भेटलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू महिन्याभरात पुन्हा घरच्यांपासून दूर जाणार आहेत. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला जुलैमध्ये वेस्ट इंडीज आणि त्यानंतर लगेच ऑगस्टमध्ये बांग्लादेशाच्या दौऱ्यावर जायचे आहे. महिन्याभरात त्यांना 13 सामने खेळायचे असल्याने ते लवकरच पुन्हा कुटुंबियांपासून दूर होणार आहेत. वेस्ट इंडीज दौऱ्यात पाच टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. तर बांग्लादेश दौऱ्यात पाच टी-20 सामने खेळवले जाणार आहेत.

संबंधित बातम्या 

IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार पुन्हा बदलणार, कोण असेल नवा कर्णधार?

IPL in UAE : बीसीसीआयने तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं, आता कमी दिवसात 31 सामने खेळवण्याचं चॅलेंज

IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय

(After IPL 2021 Suspended Australian Players Met Family got Emotional)