Video : तिलक वर्माने मारलेला षटकार पाहीला का? चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर

भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 175 धावा केल्या आणि विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात तिलक वर्माने मारलेला षटकार चर्चेचा विषय ठरला. त्याला कारणही तसंच आहे.

Video : तिलक वर्माने मारलेला षटकार पाहीला का? चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर
Video : तिलक वर्माने मारलेला षटकार पाहीला का? चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 09, 2025 | 9:47 PM

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. या सामन्यात भारताने 20 षटकात 6 गडी गमावले आणि 175 धावा केल्या. भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वोत्तम खेळी केली. त्याने 28 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकार मारत नाबाद 59 धावा केल्या. त्यानंतर तिलक वर्माने 26 धावांची खेळी केली. तसं पाहीलं तर तिलक वर्माची खेळी काही खास नव्हती. त्याने 32 चेंडूंचा सामना केला. 2 चौकार आणि 1षटकारांच्या मदतीने 26 धावा केल्या. यात त्याने एकमेक षटकार मारला. पण त्या षटकाराची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर त्याने मारलेला षटकार वारंवार व्हिडीओ प्ले करून पाहीला जात आहे. कारण हा षटकार काही साधासुधा नव्हता. परफेक्ट टायमिंगवर बसलेला हा फटका थेट स्टेडियमच्या बाहेर गेला.

भारताचे तीन विकेट झटपट बाद झाल्याने तिलक वर्माही सावध खेळी करत होता. त्याने 24 चेंडूत 16 धावा केल्या होत्या. दक्षिण अफ्रिकेकडून 10वं षटक टाकण्यासाठी एनरिक नोर्त्जे आला होता. त्याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूचा सामना करताना तिलक वर्माने उत्तुंग षटकार मारला. आखुड टप्प्याचा चेंडू तिलक वर्माने बरोबर हेरला आणि तशी बॅट फिरवली. हा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला. त्याने मारलेला षटकार पाहण्यासाठी खेळाडूंसह प्रेक्षकांनाही मान करावी लागली. हा चेंडू स्टेडियमच्या पत्र्यावर पडला आणि बाहेर गेला.

तिलक वर्माने मारलेल्या षटकाराची लांबी काही क्षणात समोर आली. त्याने 89 मीटर लांब षटकार मारला. त्याच्या षटकारामुळे सामना काही काळ थांबवावा लागला. त्यानंतर पंचांनी नवा चेंडू मागवला आणि सामन्याला पुन्हा सुरुवात झाली. दुसरीकडे, तिलक वर्मा दबावात सावध पण चांगली खेळी करतो हे पुन्हा अधोरेखित झालं. पण या दरम्यान धावांचं गणित जुळवण्यासाठी एखाद दुसरा फटका थेट सीमेपार पाठण्यासही मागे पुढे पाहात नाही. दरम्यान, तिलक वर्माने टी20 क्रिकेटमध्ये 1000 धावांचा पल्ला गाठला आहे.