
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20I मालिकेत दणदणीत सुरुवात केली आहे. टीम इंडियाने कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या टी 20I सामन्यात एकतर्फी आणि धमाकेदार विजय मिळवला. हार्दिक पंड्या याने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे हे आव्हान विजयासाठी पुरेसं आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी कमाल बॉलिंग केली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला गुडघे टेकण्यास भाग पाडलं. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 12.3 ओव्हरमध्ये 74 रन्सवर गुंडाळलं. भारताने यासह पहिलाच सामना हा 101 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 176 धावांचा पाठलाग करायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला. अर्शदीप सिंह याने क्विंटन डी कॉक याला भोपळाही फोडून दिला नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचं धावांआधी विकेटचं खातं उघडलं. इथून भारताने दक्षिण आफ्रिकेला झटपट पटापट झटके दिले. भारताच्या गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला झुंज देता आली नाही.
दक्षिण आफ्रिकेसाठी डेवाल्ड ब्रेव्हीस याने सर्वाधिक 22 धावा केल्या. कॅप्टन एडन मार्रक्रम आणि ट्रिस्टन स्टब्स या दोघांनी प्रत्येकी 14-14 धावा केल्या. तर मार्को यान्सेन याने 12 धावांचं योगदान दिलं. या चौघांव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. टीम इंडियाचे सर्व गोलंदाज यशस्वी ठरले.
टीम इंडियासाठी अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल या चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. हार्दिकने 1 विकेट घेतली. तर शिवम दुबे याने विकेट घेताच दक्षिण आफ्रिकेचं पॅकअप झालं. भारताने यासह सामना जिंकला.
त्याआधी टीम इंडियाला टॉस गमावल्याने बॅटिंग करावी लागली. टीम इंडियाचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरले. मात्र मधल्या फळीतील फलंदाजांनी भारताला सावरलं. तिलक वर्मा, अक्षर पटेल, जितेश शर्मा आणि शिवम दुबे या चौघांनी निर्णायक योगदान दिलं. तर हार्दिकने चाबूक अर्धशतकी खेळी साकारली.
टीम इंडियाची विजयी सलामी
Dominant India go 1-0 up in the five-match T20I series against the Proteas 👊#INDvSA 📝: https://t.co/ncKiOuMT7V pic.twitter.com/e6JdLvVg9x
— ICC (@ICC) December 9, 2025
तिलक वर्मा याने 26, अक्षरने 23, शिवम दुबे याने 11 आणि जितेश शर्मा याने 10 धावांचं योगदान दिलं. तर हार्दिक पंड्या याने 28 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 6 फोरसह नॉट आऊट 59 रन्सची खेळी साकारली. तर दक्षिण आफ्रिकेसाठी लुंगी एन्गिडी याने 3 विकेट्स मिळवल्या.