इंग्लंडला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नमवण्यासाठी भारताच्या रणरागिणी सज्ज!

भारतीय महिला संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असून 2 जून रोजी सर्व संघ रवाना होणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण संघाने पहिली कोरोनावरील लस घेतली असून दुसरी लस इंग्लंडमध्ये घेणार आहेत.

इंग्लंडला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नमवण्यासाठी भारताच्या रणरागिणी सज्ज!
भारतीय महिला क्रिकेट टीम

लंडन : एकीकडे भारताचा पुरुष क्रिकेटपटूंचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी (WTC Final) सज्ज झाला आहे. त्यात भारतीय महिला क्रिकेटपटू देखील जूनमध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यासाठी संपूर्ण संघ 2 जून रोजी खाजगी विमानाने इंग्लंडला रवाना होईल. महिनाभर चालणाऱ्या या दौऱ्यात एका कसोटीसह प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. (Indian Women Cricketers Ready for England Cricket tour with Covid 19 Vaccination)

भारतीय महिला क्रिकेट (Indian Women Cricket Team) संघ 2 जूनरोजी पुरुष संघासह खाजगी विमानातून इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. विशेष म्हणजे भारतीय महिला संघ 7 वर्षानंतर इंग्लंडमध्ये कसोटी सामने खेळणार आहे. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करुन सामन्यांना सुरुवात होईल. जवळपास दीड महिना चालणारा हा दौरा 15 जुलै रोजी संपणार आहे.

असा असेल इंग्लंडचा दौरा

भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघात एकूण सात सामने खेळवले जातील. ज्यातील पहिला कसोटी सामना  16 जून रोजी ब्रिस्टॉल येथे खेळवला जाईल. त्यानंतर पहिला एकदिवसीय सामना ही ब्रिस्टॉल येथेच खेळवला जाईल. दुसरा एकदिवसीय सामना 30 जूनला टॉन्टनमध्ये खेळवण्यात आणि अखेरचा एकदिवसीय सामना वॉरेस्टरमध्ये पार पडणार आहे. एकदिवसीय सामन्यांनंतर टी-20 मालिकेला 9 जुलैला सुरुवात होईल. ज्यात पहिला सामना नॉर्थेम्प्टन, दुसरा सामना 11 जुलैला ब्रिगटॉन येथे खेळवला जाईल. दौऱ्यातील अखेरचा सामना चेम्सफोर्ड येथे 14 जुलैला खेळवण्यात येईल.

कोरोनाची दुसरी लस इंग्लंडमध्ये

भारतीय महिला संघातील बहुतांश खेळाडूंनी कोरोनाप्रतिबंधक लस घेतली होती. उर्वरीत खेळाडूंना देखील गुरुवारी लस देण्यात आली असून दुसऱ्या लशीची जबाबदारी युकेच्या स्वास्थ विभागाकडे (UK Health Department) सोपवण्यात आली आहे. सर्व खेळाडूंनी कोव्हिशिल्ड लशीचा (Covishield vaccine) डोस घेतला असल्याची माहिती ही सूत्रांकडून समोर आली आहे.

संबधित बातम्या :

क्रिकेटला रामराम ठोकून कोण पोलीस बनलं, कोण पत्रकार तर कोण पायलट!, वाचा खास….

तीन द्विशतकं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 शतकं, रोहित शर्माच्या पहिल्या शतकाची भन्नाट कहाणी!

T-20 World Cup 2021 : चार संघ स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करणार तर विश्चचषक ‘हा’ संघ जिंकणार, पाकच्या खेळाडूचं भाकित

(Indian Women Cricketers Ready for England Cricket tour with Covid 19 Vaccination)