‘रात्र-रात्रभर झोप लागत नव्हती’, रवींद्र जाडेजाने शेअर केला ‘तो’ अनुभव

भारताचा विश्वासू अष्टपैलू रवींद्र जाडेजाने काही वर्षांपूर्वीचा एक अनुभव सांगितला. ज्यात तणावामुळे त्याला रात्रीची झोपही नव्हती लागत...

'रात्र-रात्रभर झोप लागत नव्हती', रवींद्र जाडेजाने शेअर केला 'तो' अनुभव
रवींद्र जाडेजा

मुंबई : सध्या भारतीय संघासह जगातील उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जाडेजाचा नाव घेतल जातं. मागील काही वर्षात त्याने गोलंदाजी, फलंदाजीच नाही तर क्षेत्ररक्षणाने देखील सर्वांची मन जिंकली आहेत. सध्या तो भारतीय संघात फिनिशरचा रोल निभावत आहे. मात्र एक वेळ अशी होती जेव्हा जाडेजाला तणावामुळे रात्रीची झोप लागत नव्हती. इंडियन एक्सप्रेस या वृत्तसंस्थेशी बोलताना त्याने याबाबतची माहिती दिली. (Ravindra Jadeja Shares His Horrible Experieance When out of Indian Team)

भारत 2017 साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पराभूत झाला. त्यानंतर जाडेजाला अंतिम 11 मधून काढून टाकण्यात आले. यावेळी जवळपास दीड वर्ष तो क्रिकेटपासून दूर होता. दरम्यान याचवेळी तणावामुळे रात्रीची झोप नव्हती लागत. सकाळी 4-5 वाजेपर्यंत मी जागा असायचो, मी संघासोबत तर होतो पण सामन्यात मला खेळवले जात नव्हते. यावेळी मी फक्त परत संघात कसा येऊ? याचाच विचार करत होतो. अशी प्रतिक्रिया जाडेजाने दिली.

इंग्लंडच्या दौऱ्यावर केलं ‘कमबॅक’

वर्षभराहून अधिक काळ सामना न खेळणाऱ्या जाडेजाने 2018 मध्ये इंग्लंड दौऱ्यातील ओवल येथील कसोटी सामन्यात संघात पुनरागमन केलं. सामन्यात त्याने 86 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. भारताची धावसंख्या 160 वर 6 विकेट अशी असताना जाडेजाने तो डाव 332 धावांपर्यंत पोहोचवला. त्यानंतर संघात आलेल्या जाडेजाने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. याबद्दल सांगताना जाडेजा म्हणाला,”त्या कसोटी सामन्याने माझ्यासाठी सगळच बदलला, माझा आत्मविश्वास परत आला. त्यातच हार्दीक पांड्याला दुखापत झाल्याने मला एकदिवसीय संघातही स्थान मिळालं. ज्यामुळे माझा खेळ आणखी सुधारला.”

जाडेजा का झाला होता टीकांचा धनी?

रवींद्र जाडेजा सुरुवातीपासूनच एक उत्तम डावखुरा अष्टपैलू खेळाडू होता. संघात त्याला कायम स्थान दिले जात होते. मात्र भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये 2017 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये जाडेजाकडून असे काही झाले की, त्याच्यावर चाहत्यांनी टीकांचा भाडिमार केला. संघातूनही त्याला बाहेर करण्यात आले. याचे कारण पाकिस्तानच्या 338 या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताचा संघ अक्षरश: ढासळला. विजयासाठीच्या भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज एक-एक करुन आऊट होत होते. त्यावेळी हार्दीकने एकाकी झुंज देत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याच दरम्यान जाडेजाच्या चूकीच्या कॉलमुळे हार्दीक आऊट झाला आणि सामना भारताने गमावला. त्यामुळे पराभवाचे सर्व खापर जाडेजावर फोडण्यात आले आणि संघातूनही त्याला डच्चू देण्यात आला.

हे ही वाचा :

तुझं आणि माहीचं नातं फक्त 2 शब्दात सांग, फॅन्सच्या प्रश्नावर विराटचं ‘हृदय’ जिंकणारं उत्तर!

ट्रोलर्सना कसं देतोस उत्तर?, चाहत्याच्या प्रश्नावर कोहलीचा हटके जवाब, फोटो शेअर करत दिलं उत्तर

एक पराभव आणि प्रशिक्षकाला डच्चू, नामांकित संघाने महान माजी खेळाडूला घरी पाठवलं!

(Ravindra Jadeja Shares His Horrible Experieance When out of Indian Team)