धोनी आणि पंतमध्ये सतत तुलना कशाला?, ऋषभच्या प्रशिक्षकाला राग अनावर

भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने मागील काही सामन्यांत धमाकेदार खेळी केली आहे. त्यामुळे तो भारतीय संघातील एक महत्त्वाचा खेळाडू झाला आहे.

धोनी आणि पंतमध्ये सतत तुलना कशाला?, ऋषभच्या प्रशिक्षकाला राग अनावर
ऋषभ पंत आणि महेंद्र सिंग धोनी

नवी दिल्ली : भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) आपल्या खेळामुळे सर्वांनाच प्रभावित करतो आहे. काही महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियात गावस्कर-बॉर्डर ट्रॉफी जिंकवून देण्यातही पंतने महत्त्वाची कामगिरी केली. त्यानंतर पंत भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू झाला आहे. त्याला भारती क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) भावी कर्णधार ही म्हटलं जात आहे. सोबतच त्याची तुलना भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्र सिंग धोनी बरोबर ही केली जाते. मात्र याच तुलनेवरुन पंतचे बालपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा (Tarak Sinha) रागवले असून पंत आणि धोनीची तुलना करणे बंद केले पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. (Rishabh Pant Coach Tarak Sinha Got Angry on Pant And Mahendrasingh Dhoni Comparison)

न्यूज 18 या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तारक सिन्हा म्हणाले की, ”पंत हा निश्चितच एक गेमचेंजर आहे सामना जिंकवून देण्याची क्षमता त्याच्यात आहे. मात्र सतत त्याची तुलना धोनीशी का केली जाते? धोनीला त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी वेळ लागला होता. पंतची तर ही केवळ सुरुवात आहे.” तसंच पंतकडून यष्टीरक्षणावेळी चूक झाली, तर प्रेक्षक धोनी-धोनी असे ओरडायचे ज्याचा पंतच्या खेळावर परिणाम झाला होता आणि त्यामुळेच तो मागील वर्षी संघातून बाहेर गेला होता. असंही सिन्हा म्हणाले.

पंतची इच्छाशक्ती अतुट

सिन्हा पंतच्या इच्छाशक्तीबद्दल बोलताना म्हणाले, ”रोहन गावस्कर हा खराब खेळाडू नव्हता, पण सतत वडील सुनिल गावस्करांशी तुलना झाल्यामुळे त्याच्या खेळावर त्याचा परिणाम झाला. पंतसोबतही तसेच झाले होते. मात्र त्या परिस्थितही पंतने हिम्मत न हारता अतुट इच्छाशक्तीच्या जोरावर आपला खेळ सुधारला आणि संघात महत्त्वाचे स्थान काबिज केले”

डब्ल्यूटीसी फायनलसाठी पंत तयार

यंदा कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून ऋषभ पंतने सर्वोत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने 2021 या वर्षांत आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये पंतने 10 डावांमध्ये 64.38 च्या सरासरीने 515 धावा ठोकल्या. ज्यात एका शतकासह 4 अर्धशतकांचा समावेश होता. दरम्यान आता पंत यंदाच्या वर्षातील सर्वांत महत्त्वाचा कसोटी सामना असणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. तो यासाठी जीममध्ये दिवस-रात्र घाम गाळत आहे.

संबधित बातम्या :

क्रिकेटला रामराम ठोकून कोण पोलीस बनलं, कोण पत्रकार तर कोण पायलट!, वाचा खास….

तीन द्विशतकं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 शतकं, रोहित शर्माच्या पहिल्या शतकाची भन्नाट कहाणी!

T-20 World Cup 2021 : चार संघ स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करणार तर विश्चचषक ‘हा’ संघ जिंकणार, पाकच्या खेळाडूचं भाकित

(Rishabh Pant Coach Tarak Sinha Got Angry on Pant And Mahendrasingh Dhoni Comparison)