WTC Final : विजयासाठी भारतीय फलंदाजांनी आखली खास रणनीती, टीम इंडियाचं ‘मिशन-400’ नेमकं काय?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याला 18 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. आयसीसी कसोटी रँकिगमधील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमाकांचे संघ भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हा सामना रंगेल.

  • Updated On - 7:09 pm, Tue, 25 May 21 Edited By: Sachin Patil
WTC Final : विजयासाठी भारतीय फलंदाजांनी आखली खास रणनीती,  टीम इंडियाचं 'मिशन-400' नेमकं काय?
indian test cricket team

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (WTC Final) जसजसा जवळ येत आहे, तशी सर्वांचीच उत्सुकता वाढत आहे.भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ सध्या आपआपली रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्याला 18 जूनपासून इंग्लंड (England) सुरुवात होणार आहे.  भारतीय खेळाडू सध्या घरीच विलगीकरणात असले तरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संघ विजयाची रणनीती आखत आहे.   भारतीय संघ (Indian Cricket Team) विजयासाठी ‘मिशन-400’ अवलंबणार आहे. (Team India Mission 400 to Win ICC World Test Championship Final 2021 against New Zealand)

‘मिशन-400’ मध्ये भारतीय संघाच्या फलंदाजावर मोठी जबाबदारी असणार आहे. यानुसार फलंदाजांना पहिल्या डावात किमान 400 धावांचा टप्पा गाठायचा आहे. कसोटी सामन्यात बहुधा गोलंदाज हे सामना जिंकवण्याच्या भूमिकेत असतात तर फलंदाज सामना वाचवण्याच्या. मात्र WTC च्या फायनलमध्ये भारतीय संघ फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभी करुन विजय सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी प्रत्येक डावात किमान 400 धावा उभारण्याचे मिशन भारतीय संघाचं आहे.

 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील कामगिरी

भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत 17 सामने खेळले आहेत. त्यापैकी 12 सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. तर 4 सामन्यांत  पराभव पत्करावा लागला असून एक सामना अनिर्णीत राहिला. इतर संघाच्या तुलनेत भारतीय संघाने सर्वाधिक सामने जिंकले आहेत.

भारतासाठी परदेशात विजय खडतर

विजयासाठी भारतीय संघ मिशन 400 चा अवलंब करणार असला तरी आतापर्यंत WTC मध्ये भारतीय संघाने एका डावात 400 धावांचा आकडा केवळ 5 वेळाच पार केला आहे. ज्यातील 4 सामने भारतात झाले होते. केवळ एकदाच परदेशात भारतीय संघाने एका डावात 400 धावा केल्या आहेत.  आजपर्यंतच्या कसोटी सामन्यांत भारतीय संघाने परदेशातील खेळपट्टीच्या तुलनेत मायभूमीत अधिक विजय मिळवले आहेत.

भारताची तगडी फलंदाजी

भारतीय संघात रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्यासारखे अनुभवी फलंदाजासह शुभमन गिल (Shubhman Gill) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यासारखे स्फोटक युवा फलंदाज आहेत. तसेच हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि आश्विनसारखे (Ashwin)  फलंदाज असल्याने भारतीय संघाला 400 धावांचा आकडा पार करणे तसे फारसे अवघड नाही. केवळ खेळपट्टीचा अंदाज घेऊन संयमी खेळी केल्यास भारत सहज लक्ष्य गाठू शकतो.

कोहलीकडे  नामी संधी

भारतीय संघाला तिन्ही फॉरमेटमध्ये नंबर वन करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मात्र असे असूनही विराटकडे आयसीसीची कोणतीही ट्रॉफी नसल्याची खंत सर्वच भारतीयांना जाणवते.  2019 चा विश्वचषक सेमी-फायनलमध्ये हरल्यानंतर आता मात्र आयसीसीची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी जिंकण्याची नामी संधी विराटकडे आहे.

संबंधित बातम्या 

सूर्यकुमार यादवचं डेअरिंग, सूर्या जेव्हा विराट कोहलीला भर मैदानातच भिडला

IPL 2021 : आयपीएलचे राहिलेले सामने आमच्या देशात नको, तिकडे UAE ला जा   

तर सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली तब्बल 30 शतकांनी पुढे असेल!

(Team India Mission 400 to Win ICC World Test Championship Final 2021 against New Zealand)