
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाने पहिल्यांदाच जेतेपद मिळवलं आहे. आतापर्यंत भारतीय महिला संघाची जेतेपदाची संधी दोनदा हुकली होती. मात्र तिसऱ्यांदा तसं झालं नाही. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने दक्षिण अफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं. एक संघ म्हणून भारतीय संघाने सर्वात्तम कामगिरी केली. प्रत्येक पैलूंवर भारतीय संघाची खंबीर बाजू दिसून आली. मग ती फलंदाजी असो, गोलंदाजी असो की क्षेत्ररक्षण.. महाराष्ट्रातील तीन खेळाडूंनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्या खेळाडूंचा महाराष्ट्र सरकारकडून सन्मान करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे त्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. भारतीय महिला क्रिकेट संघातील महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना महाराष्ट्र सरकारकडून रोख बक्षीस देखील देण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिवाय संपूर्ण भारतीय संघाचा सत्कार करण्यात येणार आहे.
मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्सने या स्पर्धेतील उपांत्य फेरीत केलेली कामगिरी कोण विसरू शकतं. जेमिमाने उपांत्य फेरीत नाबाद 127 धावांची खेळी केली. तिच्या या खेळीमुळे टीम इंडियाला अंतिम फेरी गाठता आली होती. इतकंच साखळी फेरीत न्यूझीलंडविरूद्धच्या करो या मरोच्या सामन्यातही जेमिमा चमकली होती. इतकंच काय तर क्षेत्ररक्षणातही तिने चांगली कामगिरी केली. त्यामुळे जेमिमा रॉड्रिग्सच्या खेळीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. स्मृती मंधानाकडे भारताच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी होती. सांगलीकर स्मृती मंधानाने देखील या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिली. स्मृतीने 54.24 च्या सरासरीने 434 धावा केल्या. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता.
Maharashtra cabinet passed a proposal to congratulate the World Cup-winning Indian woman’s cricket team for their achievement. A proposal was brought in the cabinet where CM and other ministers praised the performance of Indian Women’s cricket team and passed a cabinet proposal…
— ANI (@ANI) November 4, 2025
दुसरीकडे, राधा यादवने भारतीय संघात फिरकीची जबाबदारी सांभाळली. राधा यादव या स्पर्धेत फक्त तीन सामने खेळले. त्यापैकी दोन सामने हे धाकधूक वाढवणारे होते. यात साखळी फेरीतील शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध झाला. हा सामना पावसामुळे रद्द झाला. तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेविरूद्ध मैदानात उतरली. दोन सामन्यात राधा यादवने विकेट घेतल्या. बांगलादेशविरुद्ध 6 षटकात 30 धावा देत 3 गडी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 षटकात 66 धावा देत 1 विकेट घेतली. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध विकेट मिळाली नाही पण पाच षटकात तिने फलंदाजांना बऱ्यापैकी रोखून धरलं.