टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, कोणाला मिळाली संधी ते जाणून घ्या
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. या स्पर्धेसाठी अवघ्या 40 दिवसांचा अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. सहावेळा ऑस्ट्रेलियाने जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच दबदबा दिसू आला आहे.

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं यंदा नववं पर्व आहे. आतापर्यंत झालेल्या आठ पर्वात सहा जेतेपदावर ऑस्ट्रेलियाने नाव कोरलं आहे. तर एकदा इंग्लंड आणि एकदा वेस्ट इंडिजने नाव कोरलं आहे. भारताची आयसीसी चषकांची झोळी अद्याप रितीच आहे. 2009 मध्ये इंग्लंड, 2010 ऑस्ट्रेलिया, 2012/13 मध्ये ऑस्ट्रेलिया, 2013/14 मध्ये ऑस्ट्रेलिया, 2015/16 मध्ये वेस्ट इंडिज, 2018/19 मध्ये ऑस्ट्रेलिया, 2019/20 मध्ये ऑस्ट्रेलिया, 2022/23 मध्ये ऑस्ट्रेलिया असं जेतेपदावर नाव कोरलं आहे. आता नवव्या पर्वाचं बिगुल वाजलं असून 3 ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या 40 दिवसाआधीच ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर केला आहे. या संघाचं नेतृत्व यष्टीरक्षक ॲलिसा हिली ही करणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज जेस जोनासेनला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. जोनासनने 204 आंतरराष्ट्रीय सामन्यात 244 विकेट घेतल्या आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध 2023 मध्ये मालिका खेळल्यानंतर टी20 संघात स्थान मिळालं नाही. तसेच 2023 वर्षाच्या शेवटी भारताविरुद्ध वानखेडेत कसोटी खेळली होती. बिग बॅश 2023 स्पर्धेत 24 विकेट घेतल्या होत्या. तर वुमन्स प्रीमियर लीग 2024 मध्ये 11 विकेट नावावर आहेत.
ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या गटात आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना 4 ऑक्टोबरला श्रीलंकेशी होणार आहे. 8 ऑक्टोबर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. 11 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड लढत होईल. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया 13 ऑक्टोबरला आमनेसामने येतील.
ऑस्ट्रेलिया टी20 संघ: ॲलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राउन, ऍश गार्डनर, किम गर्थ, ग्रेस हॅरिस, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅक्ग्रा (उपकर्णधार), सोफी मोलिनेक्स, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शट, ॲनाबेल सदरलँड , जॉर्जिया वेरेहॅम, टायला व्लेमिंक
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बांगलादेशमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. पण राजकीय उलथापालथ आणि हिंसक वातावरण पाहता आयसीसीने टी20 वर्ल्डकप स्पर्धा हलवण्याचा निर्णय घेतला. आता ही स्पर्धा दुबईच्या शारजाह स्टेडियममध्ये होणार आहे.3 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत एकूण10 संघ सहभागी होणार आहेत. पहिल्या उपांत्य फेरीचा सामना 17 ऑक्टोबरला, तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना 18 ऑक्टोबरला होणार आहे. अंतिम सामना 20 ऑक्टोबरला होणार आहे.
