
India Women vs Australia Women : अजून एक क्रिकेट वर्ल्ड कप आणि ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा पराभव. महिला वर्ल्ड कप 2017 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर आश्चर्यकारक विजय मिळवला. पण त्यानंतर टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कपमध्ये यश मिळालं नाही. यावेळी आपल्याच भूमीवर टीम इंडियाकडे ही संधी होती. काल ICC महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये विशाखापट्टणम येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना झाला. या मॅचमध्ये टीम इंडिया विजय मिळवेल असं सर्वांना वाटलं होतं, तशी संधी होती. पण पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने सिद्ध केलं की, हा किताब त्यांच्याकडून काढून घेणं किती कठिण आहे. ऑस्ट्रेलियाने टुर्नामेंटच्या 13 व्या सामन्यात टीम इंडियाला 3 विकेटने हरवलं. त्याचा परिणाम पॉइंट्स टेबलवर सुद्धा झाला. पण टीम इंडियाच्या पोजिशनला सध्या फार नुकसान झालेलं नाही.
रविवारी 12 ऑक्टोंबर रोजी सामना झाला. भारतीय टीमने प्रथम फलंदाजी करताना 330 धावांचा डोंगर उभारला. टीम इंडियासाठी स्मृती मंधानाने 80 आणि प्रतिका रावलने 75 धावांची खेळी केली. या ओपनिंग जोडीने पहिल्या विकेटसाठी 25 ओव्हरमध्ये 155 धावांची पार्टनरशिप करुन मोठ्या स्कोरचा पाया रचला. पण, तरीही टीम इंडिया पूर्ण 50 ओव्हर खेळू शकली नाही. 48.5 ओव्हर्समध्ये ऑलआऊट झाले. ऑस्ट्रेलियाकडून एनाबेल सदरलँडने 5 विकेट काढल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने एलिसा हिलीने 142 धावांच्या तुफानी शतकाच्या बळावर 49 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून मॅच जिंकली.
पहिल्या-दुसऱ्या स्थानावर कुठले संघ?
ऑस्ट्रेलियाचा यंदाच्या वर्ल्ड कपमधील हा तिसरा विजय आहे. त्यांचे 4 सामन्यात 7 पॉइंट झालेत. ऑस्ट्रेलियाने 4 पैकी 3 सामने जिंकलेत. श्रीलंकेविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द झालेला. त्यामुळे दोन्ही टीम्सना एक-एक पॉइंट मिळाला. भारताविरुद्ध मिळालेल्या विजयाने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन टीम पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर आहे. विद्यमान चॅम्पियन इंग्लंडची टीम 6 पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंड टीमने तीन सामने खेळले असून तिन्हीमध्ये विजय मिळवलाय.
तर ते भारताच्या पुढे जातील
टीम इंडियाचा हा सलग दुसरा पराभव आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला. मागच्या सामन्यात पराभव होऊनही पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडियाच्या स्थानाला धक्का लागला नव्हता तसच या मॅचमध्ये पराभव होऊन्ही पोजिशन बदलेली नाही. 4 सामन्यात 4 पॉइंट्ससह ते तिसऱ्या स्थानावर आहेत. पण नेट रनरेटमध्ये घसरण झाली आहे. पण चौथ्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत रनरेट चांगला आहे. सोमवारी 13 ऑक्टोंबर रोजी दक्षिण आफ्रिकेचा सामना बांग्लादेश विरुद्ध आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला तर ते भारताच्या पुढे जातील.