Sachin Tendulkar : टीम इंडियाच्या पराभवामुळे सचिनही निराश, 3 सवाल विचारत म्हणाला…
तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा 3-0 असा झालेला थेट पराभव सगळ्यांच्याच जिव्हारी लागला आहे. न्यूझीलंडने भारताला लोळवत हा मालिका विजय नोंदवल्यानंतर भारतीय संघावर चहूबाजूंनी टीकेचा भडिमार होत आहे. याचदरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही या परभावर प्रतिक्रिया देत काही सवाल उपस्थित केले आहेत.
घरच्या मैदानावरच न्यूझीलंडने भारतीय संघाला अक्षरश: धूळ चारली आहे. तीन कसोटी सामन्यांची मालिका न्यूझीलंडच्या संघाने लीलया खिशात घालत भारताला लोळवलं. हा पराभव फक्त खेळाडूंच्याच नव्हे तर भारतातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या जिव्हारी लागला आहे. याचदरम्यान गॉड ऑफ क्रिकेट नावाने ओळखला जाणारा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही या पराभवानंतर चिंता व्यक्त केली आहे. भारतीय खेळाडूंनी लोटांगण घातल्यानंतर सचिनने सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. तीन सामन्यांची ही मालिका गमावल्यानंतर सचिनने काही सवालगही उपस्थित केले आहेत. मात्र त्याचवेळी त्याने शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांचे कौतुकही केले. इतर खेळाडू नांग्या टाकत असताना या दोघांनी बाजू सावरण्याचा पूरेपूर प्रयत्न केला होता.
पराभवानंतर मास्टर ब्लास्टरने व्यक्त केली चिंता
भारताच्या कसोटी मालिका पराभवानंतर सचिनने X या सोशल मीडिया नेटवर्किंग साईटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘ घरच्या मैदानावर 3-0 ने झालेला पराभव पचवणे खूपच कठीण आहे. आणि याचसाठी ( पराभवासाठी) आत्मपरीक्षण करणेही खूप महत्वाचे आहे. (खेळाडूंची) तयारी कमी झाली का ? खराब शॉट सिलेक्ट केले का ? की मॅच प्रॅक्टिस कमी पडली ?’ असे 3 महत्वाचे सवाल सचिनने या पोस्टमधून विचारले आहेत.
Losing 3-0 at home is a tough pill to swallow, and it calls for introspection. Was it lack of preparation, was it poor shot selection, or was it lack of match practice? @ShubmanGill showed resilience in the first innings, and @RishabhPant17 was brilliant in both innings— his… pic.twitter.com/8f1WifI5Hd
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 3, 2024
मात्र त्याचवेळी त्याने शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्या खेळीचे कौतुक केलं. शुभमन गिलने पहिल्या डावात 90 धावा केल्या तर पंतने दोन्ही डावात अर्धशतक फटकावलं. त्या दोघांच्याही खेळीचं सचिनने कौतुक केलं. ‘शुभमन गिलने पहिल्या डावात लवचिकता दाखवली आणि ऋषभ पंतने दोन्ही डावात चमकदार कामगिरी केली. आव्हानात्मक परिस्थितीतही त्याच्या फूटवर्कने कमाल केली. तो खरोखरचं हुशारीने खेळला ’ अशा शब्दांत सचिनने त्याची पाठ थोपटली.
न्युझीलंडचेही केले कौतुक
याच ट्विटमध्ये सचिनने न्युझीलंडच्या संघाला विजयाबद्दल शुभेच्छा देत त्यांचे कौतुकही केलं. ‘ संपूर्ण सीरिजमध्ये चांगला खेळ करण्याचे श्रेय न्युझीलंडच्या संघाला जातं. भारतात येऊन 3-0 ने मालिका जिंकणं हे खरोखरंच उत्तम आहे’ असं सचिनने नमूद केलं.
न्यूझीलंडने (आत्तापर्यंत) प्रथमच भारतात कसोटी मालिका जिंकली आहे. एवढंच नव्हे तर एखाद्या संघाने भारतात येऊन त्याच संघाला घरच्या मैदानावर 3-0ने पराभूत करण्याचीही ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कोणत्याच संघाला अशी कामगिरी जमली नव्हती. न्युझीलंडने बऱ्याच वर्षानंतर भारतात कसोटी सामना जिंकला आहे.