भारताकडून विंडीजचा धुव्वा, मायदेशात सलग सहावा मालिका विजय

भारताकडून विंडीजचा धुव्वा, मायदेशात सलग सहावा मालिका विजय

तिरुवअनंतपुरम : भारताने वेस्ट इंडिजवर तिरुवअनंतपुरममध्ये झालेल्या पाचव्या वन डे सामन्यात नऊ विकेट्सने मात करत मालिका 3-1 ने खिशात घातली. भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर विंडीजच्या फलंदाजांनी अक्षरशः लोटांगण घातलं. भारतीय गोलंदाजांनी विंडीजचा डाव केवळ 104 धावात गुंडाळला.

भारताकडून रोहित शर्माने नाबाद 65 धावांची खेळी करत एकहाती विजय मिळवला. 105 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताने 211 चेंडू राखून हा सामना जिंकला. रोहित शर्माने 65 आणि कर्णधार विराट कोहलीने नाबाद 33 धावांची खेळी केली. सलामीला आलेला शिखर धवन केवळ सहा धावा करुन माघारी परतला.

पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-1 ने विजय मिळवला. या मालिकेतील एक सामना टाय झाला होता. भारताने विंडीजविरुद्ध सलग आठव्यांदा मालिका जिंकली, तर मायदेशात सलग सहावी मालिका जिंकण्याचा विक्रम भारताने केला.

या मालिकेत सर्वाधिक 151 च्या सरासरीने 453 धावा करणाऱ्या विराट कोहलीला मालिकावीराचा मान देण्यात आला. विराटने या मालिकेत सलग तीन शतकं ठोकून नवा विक्रम नावावर केला.

 

भारतीय गोलंदाजांनी या मालिकेत शानदार कामगिरी केली. गेल्या काही सामन्यांपासून भारतीय गोलंदाजी टीकाकारांच्या सतत निशाण्यावर होती. कारण, विंडीजच्या फलंदाजांनी सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांची धुलाई केली होती. त्यानंतर भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांना उर्वरित सामन्यांसाठी बोलावण्यात आलं. पाचव्या वन डेत रवींद्र जाडेजाने सर्वाधिक चार विकेट घेत सामनावीराचा मान पटकावला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI